पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पूर्वसंध्येला हार्दिक पटेलला धक्का, अजून एका सहकाऱ्याने सोडली साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 05:37 PM2017-12-08T17:37:34+5:302017-12-08T17:39:20+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पूर्वसंध्येला पाटीदार अमानत आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याला धक्का बसला आहे.
अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पूर्वसंध्येला पाटीदार अमानत आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याला धक्का बसला आहे. ऐन मतदानाच्या आधी हार्दिक पटेलचे निकटवर्तीया आणि पाटीदाप अमानत आंदोलन समितीचे मोठे नेते दिनेश बांभनिया यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसने पाटीदार आरक्षणाचा मुद्दा आपल्या जाहीरनाम्यात घेतलेला नाही. त्यामुळे पाटीदार आरक्षणाचा विषय मागे पडला आहे असा आरोप त्यांनी राजीनामा देताना केला आहे. तसेच सीडी कांड प्रकरणी त्यांनी हार्दिक पटेलबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी भाजपा आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसपेक्षा हार्दिक पटेलची पाटीदार अमानत आंदोलन समितीच अधिक चर्चेत आहे. तसेच पटेलांच्या नाराजीचा मतदानामध्ये प्रभाव दिसण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. पण मतदान तोंडावर आले असताना पाटीदारांच्या समितीमध्ये फूट पडताना दिसत आहे. बांभनिया यांनी याआधी हार्दिक पटेलच्या रणनीतीवर टीका केली होती. तसेच तिकीट वाटपावरून काँग्रेसला विरोधही केला होता. काँग्रेसने पाटीदार अमानत आंदोलन समितीला विश्वासात न घेता समितीच्या सदस्यांना तिकीट दिल्यासा आक्षेप त्यांनी घेतला होता.
2015 साली आयोजित करण्यात आलेल्या महारॅली नंतर पाटीदारांची कोअर कमिटी चर्चेत आली होती. मात्र कालांतरात त्यातील बऱ्याच सदस्यांनी या समितीची साथ सोडली आहे. या संपूर्ण संघर्षात केवळ एक चेहरा बदललेला नाही तो म्हणजे हार्दिक पटेल. बांभनिया यांच्यापूर्वी केतन पटेल, चिराग पटेल, वरुण पटेल आणि रेश्मा पटेल यांनी हार्दिक पटेलची साथ सोडली आहे.