‘महाचोर’ भाजपाच्या पराभवासाठी ‘चोर’ काँग्रेसला पाठिंबा देऊ, हार्दिक पटेल यांचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 04:26 AM2017-10-25T04:26:21+5:302017-10-25T04:26:43+5:30
अहमदाबाद : गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत ‘महाचोर’ भाजपाला सत्तेवरून दूर करण्याचे आव्हान स्वीकारत असेल, तर ‘चोर’ काँग्रेसला मी पाठिंबा द्यायला तयार आहे, असे पाटीदार अनामत आंदोलनचे नेते हार्दिक पटेल यांनी म्हटले.
अहमदाबाद : गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत ‘महाचोर’ भाजपाला सत्तेवरून दूर करण्याचे आव्हान स्वीकारत असेल, तर ‘चोर’ काँग्रेसला मी पाठिंबा द्यायला तयार आहे, असे पाटीदार अनामत आंदोलनचे नेते हार्दिक पटेल यांनी म्हटले.
उत्तर गुजरातेतील मंडल येथे सोमवारी रात्री मेळाव्यात ते बोलत होते. पटेल म्हणाले, काँग्रेस हा चोर असला, तरी भाजपा महाचोर आहे. महाचोराला पराभूत करायचे असेल, तर चोराला पाठिंबा आम्हाला द्यावा लागेल व तो आम्ही देऊ, परंतु त्यासाठी संयम दाखवावा लागेल. सध्या तरी आम्ही कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाल्याच्या बातम्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना पटेल यांनी, मी सोमवारी उम्मेद हॉटेलमध्ये होतो, परंतु राहुल गांधींना मी भेटलो, अशा बातम्या आल्या असल्या, तरी त्या चुकीच्या आहेत. काँग्रेसकडून निमंत्रण आल्यावर मी रविवारी रात्री ३ वाजता हॉटेलवर पोहोचलो. मी गुजरातचे प्रभारी अशोक गेहलोत यांना भेटलो. तसाही उशीर झाला होता, त्यामुळे मी हॉटेलमध्येच थांबायचे ठरवले, परंतु त्यांनी (भाजपा) सीसीटीव्ही कॅमेºयाच्या क्लिप्ज मिळविल्या व पसरविल्या. कारण येथील सगळ््याच गोष्टी या त्यांच्या मालमत्ता आहेत, असे हार्दिक पटेल म्हणाले.
राहुल गांधी व काँग्रेसच्या नेत्यांना हार्दिक पटेल सोमवारी शहरातील उम्मेद हॉटेलमध्ये भेटले, अशा
बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. उभयतांमध्ये ४० मिनिटे चर्चा झाली व त्यातून हार्दिक पटेल भाजपाविरोधातील व्यापक आघाडीत सहभागी होतील, अशा चर्चा सुरू झाल्या. रविवारी रात्री ११.५३ ते सोमवारी दुपारी ४.१४ या दरम्यान हार्दिक पटेल हॉटेलमध्ये प्रवेश करताना व तेथून जातानाच्या पाच सीसीटीव्हीने रेकॉर्ड केलेल्या क्लिप्जमध्ये दिसते. याच हॉटेलमध्ये सोमवारी सकाळी राहुल गांधी यांचे आगमन झाले होते. (वृत्तसंस्था)
>निवडणुकांची या आठवड्यात घोषणा?
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोग या आठवड्यात करण्याची अपेक्षा आहे. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना, निवडणूक आयोगाने गुजरातेत ही निवडणूक १८ डिसेंबरच्या आधी घेऊ, असे म्हटले होते. हिमाचल प्रदेशमध्ये १८ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.