Hardik Patel Health Update: हार्दिक पटेलची तब्येत ढासळली, डॉक्टरांनी दिला रुग्णालयात नेण्याचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 10:02 AM2018-09-05T10:02:57+5:302018-09-05T12:22:19+5:30
Hardik Patel Health Update: हार्दिक यांनी 3 दिवसांपूर्वीच म्हणजे रविवारी आपले मृत्युपत्र जाहीर केले आहे. हार्दिक यांनी जाहीर केलेल्या मृत्युपत्रानुसार त्यांची संपत्ती त्यांचे आई-वडिल आणि एका गोशाळेला देण्यात येईल.
अहमदाबाद - पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलची प्रकृती ढासळली आहे. गेल्या 12 दिवसांपासून हार्दिक यांचे आमरण उपोषण सुरू आहे. शेतकरी कर्जमाफी, शिक्षण आणि नोकरीमध्ये ओबीसी समाजासह पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी हार्दीक यांनी 25 ऑगस्टपासून आमरण उपोषण केले आहे. आज या उपोषणाचा 12 वा दिवस असून त्यांची प्रकृती ढासळली आहे. तर हार्दिक यांनी रुग्णालयात भरती करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. त्यामुळे गुजरातमधील भाजप नेत्यांनी हार्दिक यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.
भाजपने या आंदोलनाची हवी तेवढी दखल घेतली नाही. त्यामुळेच, हार्दिक यांनीही प्रकृती तपासणीसाठी डॉक्टरांना नकार दिला आहे. सध्या, डॉक्टरांनी पटेल यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. उपोषणाच्या अकराव्या दिवशी पटेल यांचे वजन 20 किलोंनी कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच हार्दिक यांनी रुग्णालयात भरती करावे, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे. मात्र, हार्दिक यांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला आहे. गुजरातचे ऊर्जामंत्री सौरभ पटेल यांनी, आम्ही हार्दिक यांनी उपोषण लवकरात लवकर सोडावे, यासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. तर, गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा हार्दीक यांच्या उपोषणाबाबत काही सामाजिक संस्थांशी बोलणी केली आहे. तसेच भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा गुजरातचे माजी मुख्यमंत्री सुरेश मेहता यांनीही हार्दिक पटेलची भेट घेत तब्येतीची विचारपूरस केली आहे.
दरम्यान, हार्दिक यांनी 3 दिवसांपूर्वीच म्हणजे रविवारी आपले मृत्युपत्र जाहीर केले आहे. हार्दिक यांनी जाहीर केलेल्या मृत्युपत्रानुसार त्यांची संपत्ती त्यांचे आई-वडिल आणि एका गोशाळेला देण्यात येईल. हार्दिक यांनी जाहीर केलेल्या मृत्युपत्रानुसार त्यांच्या बँक खात्यातील 50 हजार रुपयांपैकी 20 हजार रुपये त्यांच्या आई-वडिलांना मिळणार आहेत. तर उर्वरीत 30 हजार रुपये हार्दिक यांच्या चंदननगर गावाजवळील गोशाळेला देण्यात यावेत, अशी इच्छा हार्दिकने व्यक्त केली आहे. तसेच 'हु टूक माय जॉब' या हार्दिक यांनी लिहिलेल्या पुस्तकाची 30 टक्के रॉयल्टी त्यांच्या आई-वडिल, बहिण यांना दिली जावी आणि 70 टक्के रॉयल्टी पाटीदार आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या 14 तरुणांच्या कुटुंबीयांना द्यावी, असे हार्दिक यांनी म्हटले आहे.