आमरण उपोषणाला बसलेल्या हार्दिक पटेलचे मृत्युपत्र, शेवटची इच्छा जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 12:34 PM2018-09-03T12:34:22+5:302018-09-03T12:42:33+5:30

हार्दिक यांनी जाहीर केलेल्या मृत्युपत्रानुसार त्यांच्या बँक खात्यातील 50 हजार रुपयांपैकी 20 हजार रुपये त्यांच्या आई-वडिलांना मिळणार आहेत.

Hardik Patel's will on hunger strike, announced his last wish | आमरण उपोषणाला बसलेल्या हार्दिक पटेलचे मृत्युपत्र, शेवटची इच्छा जाहीर

आमरण उपोषणाला बसलेल्या हार्दिक पटेलचे मृत्युपत्र, शेवटची इच्छा जाहीर

Next

अहमदाबाद - गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने आपले मृत्युपत्र जाहीर केले आहे. हार्दिक सध्या आमरण उपोषणावर बसले आहेत. त्यामुळे रविवारी त्यांनी आपले मृत्युपत्र घोषित केले. पाटीदार समाजाला आरक्षण आणि कर्जमाफी देण्यासाठी हार्दिक यांचे गेल्या 9 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. हार्दिक यांनी जाहीर केलेल्या मृत्युपत्रानुसार त्यांची संपत्ती त्यांचे आई-वडिल आणि एका गोशाळेला देण्यात येईल.

हार्दिक यांनी जाहीर केलेल्या मृत्युपत्रानुसार त्यांच्या बँक खात्यातील 50 हजार रुपयांपैकी 20 हजार रुपये त्यांच्या आई-वडिलांना मिळणार आहेत. तर उर्वरीत 30 हजार रुपये हार्दिक यांच्या चंदननगर गावाजवळील गोशाळेला देण्यात यावेत, अशी इच्छा हार्दिकने व्यक्त केली आहे. तसेच 'हु टूक माय जॉब' या हार्दिक यांनी लिहिलेल्या पुस्तकाची 30 टक्के रॉयल्टी त्यांच्या आई-वडिल, बहिण यांना दिली जावी आणि 70 टक्के रॉयल्टी पाटीदार आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या 14 तरुणांच्या कुटुंबीयांना द्यावी, असे हार्दिक यांनी म्हटले आहे. 

निर्दयी भाजप सरकारविरुद्ध मी 25 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण करत आहे. त्यामुळे मी शरीराने अशक्त झालो असून मला संसर्गही झाला आहे. माझी प्रकृती ढासळत चालल्याने माझ्या शरीरावर माझा विश्वास राहिला नाही. म्हणून, मी माझी शेवटची इच्छा जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याचे हार्दिक यांनी आपल्या मृत्युपत्रात म्हटले आहे. हार्दिकने आपले डोळे दान करण्याची इच्छा मृत्युपत्रात व्यक्त केली. मनोज पनारा या पाटीदार समाजातील नेत्याकडून हार्दिक यांच्या मृत्युपत्राचे वाचन करण्यात आले.  दरम्यान, हार्दीक यांच्या आंदोलनस्थळी जाऊन तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राजदसह अनेक राजकीय पक्षांतील नेत्यांनी भेट दिली आहे. मात्र, भाजपने अद्यापही या आंदोलनाची कुठलिही दखल घेतली नाही. त्यामुळेच, हार्दिक यांनीही रक्त आणि लघवी तपासणीसाठी डॉक्टरांना नकार दिला आहे. 

Web Title: Hardik Patel's will on hunger strike, announced his last wish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.