१६ वर्ष वाट पाहिली अन् जामिनावार बाहेर येताच संपवले; एकाच घरातील १८ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 17:37 IST2025-04-09T17:34:16+5:302025-04-09T17:37:07+5:30

उत्तर प्रदेशात एका कुटुंबाने जामिनावर बाहेर आलेल्या व्यक्तीची निर्घृणपणे हत्या केली.

Hardoi Murder accused who came out on bail was killed with an axe 18 arrested | १६ वर्ष वाट पाहिली अन् जामिनावार बाहेर येताच संपवले; एकाच घरातील १८ जणांना अटक

१६ वर्ष वाट पाहिली अन् जामिनावार बाहेर येताच संपवले; एकाच घरातील १८ जणांना अटक

UP Crime:उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात खूनाचा बदला खून करुन घेण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. जामिनावर बाहेर आलेल्या एका ४८ वर्षीय व्यक्तीला मारहाण करून ठार मारण्यात आले. या प्रकरणात उत्तर प्रदेशपोलिसांनी सात महिलांसह १८ जणांना अटक केली आहे. २००९ मध्ये झालेल्या एका हत्येचा बदला घेण्यासाठी जामिनावर बाहेर आलेल्या व्यक्तीचे धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. हत्या करणारे सर्व आरोपी हे एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे.

हरदोईमधल्या बहनगाव गावात ही घटना घडली. या प्रकरणी बेनीगंज पोलीस ठाण्यात ३७ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये २५ अनोळखी लोकांची नावे आहेत. मृत व्यक्तीचे नाव सरपंच महावत होते. तो रोजंदारीवर काम करत होता. ऑगस्ट २००९ मध्ये रामपालची हत्या केल्याच्या प्रकरणात महावत दोषी होता. या प्रकरणात सरपंच महावत यांचा भाऊ बबलू देखील दोषी आहे. रामपालच्या मृत्यूनंतर, महावतचे कुटुंब शेजारच्या लखीमपूर खेरी जिल्ह्यात गेले आणि ते कधीही परतले नाही.

१३ वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर महावतला तुरुंगातून सोडण्यात आले. त्यानंतर ७ एप्रिल रोजी पोलिसांना बहांगावमध्ये एका व्यक्तीला गटाकडून काठ्यांनी मारहाण होत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला लोकांच्या तावडीतून सोडवले आणि रुग्णालयात दाखल केले. मात्र  डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. महावत गावात आल्यानंतर एका व्यक्तीने रामपालच्या कुटुंबाला याची माहिती दिली. त्यामुळे महावत एका घरात लपून बसला. मात्र रामपालच्या कुटुंबाने महावत खेचून बाहेर काढलं आणि मारहाण सुरु केली.

पोलिसांनी महावतच्या कुटुंबियांना त्याच्या मृत्यूची माहिती दिली. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. शवविच्छेदनामध्ये त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याचे उघड झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये रामपालचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांचा समावेश आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 

Web Title: Hardoi Murder accused who came out on bail was killed with an axe 18 arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.