गायिका हर्षिताच्या हत्येप्रकरणी जावयाला अटक, २०१४ मध्ये हर्षितावर केला होता बलात्कार, आईच्या हत्येतही दिनेशचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 04:20 AM2017-10-21T04:20:15+5:302017-10-21T04:21:12+5:30
हरयाणवी गायिका आणि नृत्यांगना हर्षिता दहिया हिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा जावई गँगस्टर दिनेश कराला याला अटक केली आहे. या प्रकरणी अन्य चौघांना अटक करण्यासाठी पोलिसांनी धाडसत्र अवलंबले आहे.
- बलवंत तक्षक
पानीपत : हरयाणवी गायिका आणि नृत्यांगना हर्षिता दहिया हिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा जावई गँगस्टर दिनेश कराला याला अटक केली आहे. या प्रकरणी अन्य चौघांना अटक करण्यासाठी पोलिसांनी धाडसत्र अवलंबले आहे.
कराला याला पोलिसांनी झज्जर येथे आणून चौकशी केली. त्याने हत्येची कबुली दिल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दिनेशने पोलिसांना सांगितले की,त्याने २०१४ साली हर्षिताचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. याप्रकरणात हर्षिताची आई प्रेमोदेवी मुख्य साक्षीदार होती.
साक्ष न देण्यासाठी दिनेश कराला याने प्रचंड दबाव टाकला मात्र प्रेमोदेवी त्याच्या दबावाला बळी पडल्या नाही त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. पोलीस सुत्रानुसार प्रेमोदेवी हत्या आणि हर्षिता बलात्कार प्रकरणाची तारीख जवळ येत असल्याने हर्षिताची देखील हत्या करण्यात आली. करालाच्या सूचनेवरून चौघांनी तिची हत्या केल्याची माहिती उघड झाली आहे. कराला हा गँगस्टर म्हणून ओळखला जात असून त्याच्यावर सोनीपत, जिंद, झज्जर आणि दिल्लीतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. हर्षिता एका गावातील कार्यक्रम आटोपून परतत असताना चमराडा या गावी चौघांनी तिची हत्या केल्यानंतर खळबळ उडाली.
वरिष्ठ पोलीस अधीक्षक राहुल शर्मा यांच्यानुसार इतर आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. आरोपींची नावे मात्र त्यांनी उघड केली नाही. प्रेमोदेवी आणि हर्षिताची हत्या झाल्यानंतर आता त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आरोपी दिनेश कराला याची पत्नी आणि मृत हर्षिताची बहीण लता हिने आता पुढाकार घेतला आहे.
२०१२ मध्ये तिचा विवाह दिनेशसोबत झाला होता. घरगुती भांडणामुळे ती वेगळी राहायची. तिच्याही जीविताला धोका असू शकतो,हे ठाऊक असताना तिने दिनेशच्या विरोधात आता बंड पुकारला आहे.
आईच्या हत्येची होती साक्षीदार....
हर्षिताची बहीण लता हिने पती दिनेश याच्यावर आरोप केल्यामुळे तपासाला वेगळे वळण मिळाले. हर्षिताच्या आईची २०१४ मध्ये दिल्लीत हत्या झाली होती. या प्रकरणात ती मुख्य साक्षीदार होती, त्यामुळेच तिचा काटा काढण्यात आल्याचा आरोप लताने केला आहे. त्यावेळी हर्षिता दिल्लीच्या नरेला भागात वास्तव्याला होती.