मोठा निष्काळजीपणा! डॉक्टरने Video कॉल करून क्लीनरकडून केली डिलिव्हरी, बाळाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 12:24 PM2023-12-01T12:24:44+5:302023-12-01T12:32:40+5:30
निष्काळजीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाला. यानंतर कुटुंबीयांनी नर्सिंग होममध्ये गोंधळ घातला आणि पोलिसांना बोलावले.
बिहारची राजधानी पाटणा येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. दानापूर पोलीस स्टेशन हद्दीतील गोला येथे असलेल्या एका खासगी नर्सिंग होमच्या निष्काळजीपणामुळे जन्मानंतर नवजात बाळाचा मृत्यू झाला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, नर्सिंग होमच्या सफाई कर्मचाऱ्याच्या मदतीने डॉक्टरांनी घरी बसून व्हिडीओ कॉलद्वारे प्रसूती केली. यामध्ये दोघांच्या निष्काळजीपणामुळे बाळाला जन्मानंतर जीव गमवावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, निष्काळजीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाला. यानंतर कुटुंबीयांनी नर्सिंग होममध्ये गोंधळ घातला आणि पोलिसांना बोलावले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून नर्सिंग होमच्या 3 नर्सिंग स्टाफला अटक केली. तरकारी बाजार येथील रविशंकर यांची पत्नी ज्युली कुमारी हिला दानापूर पोलीस स्टेशन हद्दीतील हर्षित पाली नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. ज्युली गरोदर होती, वेदना होत असल्याने तिला गुरुवारी हर्षित पाली क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले.
नर्सिंग होमच्या डॉक्टर कांचन लता यांनी मोठी रक्कम घेऊन तिला आपल्या नर्सिंग होममध्ये दाखल केले होते. दाखल केल्यानंतर लगेचच कांचन लता कुठेतरी निघून गेल्या, ज्युलीची जबाबदारी ही नर्सिंग होममध्ये क्लीनर म्हणून काम करण्याऱ्या एका महिलेकडे दिली. डॉक्टर निघून गेल्यानंतर लगेचच ज्युलीला तीव्र प्रसूती वेदना होऊ लागल्या आणि तिने नॉर्मल प्रसूतीद्वारे नवजात बाळाला जन्म दिला. त्यावेळी रुग्णालयात स्वच्छता करणार्या महिलेसह नर्सिंग होमचे कर्मचारी उपस्थित होते, असे सांगण्यात येते. त्यांनी तातडीने याची माहिती डॉक्टर कांचन लता यांना दिली.
माहिती मिळताच डॉ.कांचन लता यांनी क्लीनर म्हणून काम करणारी महिला सुनीता व कर्मचाऱ्यांना व्हिडीओ कॉलद्वारे मूल कसं जन्माला येईल, मुलाची नाळ कशी कापायची हे सांगण्यास सुरुवात केली. परंतु योग्य ज्ञान व अनुभव नसल्याने सुनीताने बाळाची चुकीची नस कापली. यानंतर काही मिनिटांतच मुलाचा मृत्यू झाला. क्लिनिकचे कर्मचारी मुलाच्या मृत्यूची बातमी लपवण्याचा प्रयत्न करत होते. पण, बाळाच्या मृत्यूची बातमी समजताच रविशंकर यांच्या कुटुंबात खळबळ उडाली.
घटनास्थळी उपस्थित काही लोकांनी याची माहिती दानापूर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून रुग्णालयातील कर्मचारी रवींद्र कुमार, सुनीता आणि गीता यांना अटक केली आणि त्यांना सोबत घेऊन गेले. बाळाच्या नातेवाईकांनी सांगितलं की, हर्षित पाली क्लिनिकच्या डॉ. कांचन लता या गुरुवारी दुपारी क्लिनिकमध्ये पैसे घेण्यासाठी आल्या होत्या. पैसे घेतल्यानंतर त्यांनी रुग्णाची कसलीही विचारपूस केली नाही. या क्लिनिकमध्ये योग्य डॉक्टर आणि कर्मचारी नसल्याने बाळाला जीव गमवावा लागल्याचे कुटुंबीयांनी सांगितलं.