हरियाणा: अनिल वीज अचानक बैठकीतून बाहेर पडले; नायाब सिंह सैनींचे मुख्यमंत्री म्हणून नाव जाहीर झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 02:30 PM2024-03-12T14:30:17+5:302024-03-12T14:30:44+5:30
अपक्षांच्या मदतीने भाजपा सरकार स्थापन करणार असून मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वात बदल करण्यात आला आहे.
जेजेपीसोबतची लोकसभा जागा वाटपाची बोलणी फिस्कटताच भाजपाच्या हरियाणा सरकारने राजीनामा दिला होता. आता भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करणार आहे. अपक्षांच्या मदतीने भाजपा सरकार स्थापन करणार असून मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वात बदल करण्यात आला आहे.
नायाब सिंह सैनी हे हरियाणाचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. आज सायंकाळी पाच वाजता ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सैनी यांच्या नावाला पाठिंबा देण्यात आला आहे. परंतु, या बैठकीतून अर्ध्यावरच भाजपाचे बडे नेते अनिल वीज हे बाहेर पडल्याने चर्चांना उधान आले आहे.
वीज यांनी सरकारी वाहनातून न जाता खासगी वाहनातून प्रवास केला आहे. रागाच्या भरात ते सभेतून बाहेर पडल्याचे सांगितले जात आहे. अशा प्रकारे बाहेर पडण्यावर काहीही बोलण्यास वीज यांनी नकार दिला आहे. बैठकीत जे काही घडले ते केवळ निरीक्षकच सांगू शकतात, असे जाताना ते म्हणाले आहेत.
जननायक जनता पार्टीसोबतची चार वर्षे जुनी युती तुटल्याने सरकार कोसळले आहे. जेजेपी नेते आणि उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी दिल्लीत भाजप प्रमुख जेपी नड्डा यांची भेट घेतली. वृत्तानुसार, याच बैठकीत भाजपने जेजेपीसोबत लोकसभेची एकही जागा शेअर करणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, जेजेपीला लोकसभा लढवण्याची इच्छा असल्याने युती तुटली. आता चौटाला अमित शाह यांची भेट घेणार आहेत. आज सायंकाळी या दोन नेत्यांची भेट होणार आहे.