मोठी बातमी! हरियाणातील अंबालाच्या जंगलात आढळले 232 बॉम्ब, संपूर्ण परिसर सील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 09:19 PM2022-02-25T21:19:44+5:302022-02-25T21:19:56+5:30
बॉम्ब सापडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला असून, तपास सुरू केला आहे.
अंबाला: हरियाणातील अंबाला जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. येथील शहजादपूरच्या जंगलात 232 बॉम्ब सापडले आहेत. ग्रामस्थांना हे बॉम्ब जमिनीत गाडलेले आढळून आले. हे बॉम्ब खूप जुने असून त्यावर गंज चढला आहे. अंबाला पोलिस अधीक्षक जशनदीप सिंह रंधावा यांनी बॉम्ब मिळाल्याची माहिती मिळताच, बॉम्ब निकामी पोलिस पथकाला पाचारण केले आणि संपूर्ण परिसर रिकामा केला.
सूचना मिळताच बॉम्ब निकामी करणारे पथक आणि पोलिस ठाणे शहजादपूरचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, तपास सुरू आहे. पोलिसांना 232 बॉम्ब सापडले आहेत. हे बॉम्ब भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले जातील. शहजादपूर पोलिस ठाण्यात स्फोटक कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
पाहणी करण्यासाठी लष्कर दाखल झाले
शहजादपूर परिसरातील जंगलात मंगळूर गावाजवळील बेगामा नदीजवळ मोठ्या प्रमाणात बॉम्ब दिसून आल्याची माहिती ग्रामस्थांनी शुक्रवारी अंबाला पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस प्रशासनात खळबळ उडाली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. तपासादरम्यान हे बॉम्ब जप्त करण्यात आले. बॉम्ब खूप जुने असून त्यावर गंज चढला आहे. जंगल परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात बॉम्ब सापडल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे.
तपास कुठे सुरू झाला?
एवढ्या मोठ्या प्रमाणात हे बॉम्ब कुठून आले आणि ते कधीपासून इथे जमिनीत गाडले गेले होते, याचा तपास सुरू आहे. सध्या अनेक पैलूंवर तपास सुरू आहे. हा बॉम्ब सक्रिय आहे की नाही? त्याचाही तपास सुरू आहे. यावेळी पोलिसांनी ग्रामस्थांची चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले.