हरियाणामध्ये BSP-INLD आघाडीची घोषणा, भाजपा आणि काँग्रेसचं गणित बिघडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 04:28 PM2024-07-11T16:28:19+5:302024-07-11T16:28:42+5:30
Haryana Assembly Election 2024: एकेकाळी हरियाणाच्या राजकारणात वर्चस्व असलेल्या आएनएलडी आणि बहुजन समाज पक्षाने आघाडी करून हरियाणामधील राजकीय समिकरणं बदलण्याचे संकेत दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर आता या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दरम्याान, हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपामध्ये थेट लढत होणार आहे. मात्र एकेकाळी हरियाणाच्या राजकारणात वर्चस्व असलेल्या आएनएलडी आणि बहुजन समाज पक्षाने आघाडी करून हरियाणामधील राजकीय समिकरणं बदलण्याचे संकेत दिले आहेत. आज चंडीगडमध्ये आयएनएलडीचे अभय चौटाला आणि बहुजन समाज पक्षाचे आकाश आनंद यांनी या आघाडीची औपचारिक घोषणा केली. तसेच दोन्ही पक्ष विधानसभा निवडणुकीत कोण किती जागा लढवेल, याचीही घोषणा करण्यात आली आहे.
संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये आयएनएलडीचे नेते अभय चौटाला यांनी सांगितले की, हरियाणामध्ये आयएनएलडी आणि बसापामध्ये आघाडी झाली आहे. विधानसभा निवडणुकीत आयएनएलडी ५३ आणि बसपा ३७ जागांवर निवडणूक लढेल. आम्ही दोन्ही पक्षांनी मिळून एक किमान समान कार्यक्रम तयार केला आहे. जर हरियाणामध्ये आमचं सरकार स्थापन झालं तर पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत दिलं जाईल. अगदी खासगी शाळा, कॉलेज आणि विद्यापीठामध्येही मोफत शिक्षण दिलं जाईल. त्याबरोबर वृद्धांना ७ हजार ५०० पेन्शन दिली जाईल. विजेचं बिल ५०० रुपयांहून अधिक येणार नाही अशी व्यवस्था बनवली जाईल, मोफत पाणी दिलं जाईल, असं आश्वासनही अभय चौटाला यांनी दिलं.
तर आकाश आनंद यांनी सांगितले की, हरियाणामध्ये आयएनएलडी आणि बसपाचं सरकास स्थापन झाल्यावर अभय चौटाला यांना मुख्यमंत्री बनवलं जाईल. तसेच आयएनएलडी आणि बसपा यांच्याती आघाडी केवळ विधानसभा निवडणुकीपुरती नसेल तर पुढील लहान मोठ्या निवडणुकांमध्येही कायम राहील.