अवघ्या २०० दिवसांत 'त्यांनी' सूत्रं हलवली, पुन्हा भाजपाची सत्ता आणून दाखवली! हरयाणातील 'मॅन ऑफ द मॅच' 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 04:50 PM2024-10-08T16:50:13+5:302024-10-08T17:47:36+5:30

Haryana Assembly Election 2024: अगदी काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रिपदावर विराजमान झालेल्या नायाब सिंह सैनी यांनी पक्षाविरोधात असलेली शेतकरी, सैनिक आणि कुस्तीपटूंची नाराजी तसेच दहा वर्षांची अँटी इन्कम्बन्सी हे सर्व यशस्वीरीत्या थोपवून भाजपाला विजय मिळवून दिल्याने या निवडणुकीतील मॅन ऑफ द मॅच असा उल्लेख सैनी यांचा केला जात आहे.

Haryana Assembly Election 2024: In just 200 days, 'they' changed the formula, again brought the power of BJP! Haryana's 'Man of the Match'  | अवघ्या २०० दिवसांत 'त्यांनी' सूत्रं हलवली, पुन्हा भाजपाची सत्ता आणून दाखवली! हरयाणातील 'मॅन ऑफ द मॅच' 

अवघ्या २०० दिवसांत 'त्यांनी' सूत्रं हलवली, पुन्हा भाजपाची सत्ता आणून दाखवली! हरयाणातील 'मॅन ऑफ द मॅच' 

उत्तर भारतातील महत्त्वाचं राज्य हरयाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक असे लागले आहेत. येथे सत्ताधारी भाजपाच्या पराभवाचं भाकित करण्यात येत असताना पक्षाने अनपेक्षित मुसंडी मारत आतापर्यंतच्या कलांमध्ये स्पष्ट बहुमताच्या दिशेने आगेकूच केली आहे. तर ज्या काँग्रेसला एकतर्फी बहुमत मिळेल, असा दावा करण्यात येत होता. त्या काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली आहेत. दरम्यान, भाजपाला हरयाणामध्ये मिळालेल्या यशाचं श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच हरयाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी यांनाही दिलं जात आहेत. अगदी काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रिपदावर विराजमान झालेल्या नायाब सिंह सैनी यांनी पक्षाविरोधात असलेली शेतकरी, सैनिक आणि कुस्तीपटूंची नाराजी तसेच दहा वर्षांची अँटी इन्कम्बन्सी हे सर्व यशस्वीरीत्या थोपवून भाजपाला विजय मिळवून दिल्याने या निवडणुकीतील मॅन ऑफ द मॅच असा उल्लेख सैनी यांचा केला जात आहे. नायाब सिंह सैनी यांना मागच्या काही महिन्यांमध्ये भाजपासाठी प्रतिकूल असलेलाी परिस्थिती अनुकूल कशी काय केली, हे आपण आता पाहुयात.

२०१४ मध्ये हरयाणामध्ये पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर भाजपाने मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्री केले होते. मात्र खट्टर यांच्या कारभाराविरोधात असलेली नाराजी सातत्याने वाढत होती. त्यात शेतकऱ्यांचं आंदोलन हाताळण्यात अपयश आल्याने खट्टर यांच्याबाबत असलेली नाराजी अधिकच वाढली होती. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीला अवघे २ महिने असताना आणि हरयाणामधील विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला असताना भाजपाने नायाब सिंह सैनी यांना मुख्यमंत्रिपदावर बसवले होते. या नायाब सिंह सैनी यांची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी डमी मुख्यमंत्री म्हणून खिल्ली उडवली होती. मात्र हेच सैनी आजच्या निकालांमध्ये भाजपासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसले.

नायाब सिंह सैनी यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यावर लगेचच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला हरियाणामध्ये दहा पैकी ५ जागांवर पराभव पत्करावा लागला होता. तसेच राज्यातील वारे काँग्रेसच्या दिशेने वाहत असल्याचे दावे केले जाऊ लागले होते. मात्र या निवडणुकीत भाजपाने सैनी यांनाच पक्षाचा चेहरा म्हणून पुढे केले होते. सैनी यांनीही हे आव्हाना आणि राज्यातील भाजपाविरोधातील अँटी इन्कम्बन्सी यांचा यशस्वीरीत्या सामना करत पक्षाला विजय मिळवून दिला.

सैनी यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यावर त्यांच्या हातात अवघे २१० दिवस होते.  या काळात सरकारची आणि पक्षाची जनमानसातील प्रतिमा उंचावण्यासाठी त्यांनी अनेक पावलं उचलली. त्यांनी ग्रामपंचायतींच्या खर्चाची मर्यादा २१ लाखांपर्यंत वाढवली. त्याशिवाय विजेच्या बिलामध्ये घट करण्यासाठी प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना यासाठी कुटुंबांना सब्सिडी देण्यास सुरुवात केली. त्याबरोबरच मतदारांमध्ये अधिकाधिक मिसळून राहण्यास त्यांनी प्राधान्य दिलं. त्यामुळे त्यांची लोकप्रियता अधिकच वाझली होती.

लोकसभा निवडणुकीत हरयाणामध्ये भाजपासाठी अग्निवीर योजना ही अडचणीची ठरली होती. त्यावर मात करण्यासाठी नायाब सिंह सैनी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हरयाणा अग्निवीर पॉलिसी सुरू केली. त्य माध्यमातून अग्निवीरांना कार्यकाळ संपल्यानंतर नोकरी आणि उद्योगधंदे करण्यास सहाय्य करण्याची व्यवस्था करण्यात आली.  
याशिवाय हरयाणामध्ये ओबीसी समाज हा ४० टक्के आहे. त्या पार्श्वभूमीवर नायाब सिंह सैनी हे ओबीसी समाजामधील असल्याने त्यांना मुख्यमंत्रिपद देणं भाजपासाठी जातीय समिकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वाचं ठरलं. तसेच काँग्रेसच्या बाजूने जाट समाजामधून होत असलेल्या एकजुटीला बिगरजाट एकजूट उभी करणंही शक्य झालं.  

Web Title: Haryana Assembly Election 2024: In just 200 days, 'they' changed the formula, again brought the power of BJP! Haryana's 'Man of the Match' 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.