हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 04:01 PM2024-10-09T16:01:14+5:302024-10-09T16:02:23+5:30

Haryana Assembly Election 2024 Result: हरयाणा विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवत भाजपानं या राज्यात विजयाची हॅटट्रिक साधली आहे. या विजयानंतर भाजपामध्ये राज्यापासून देशपातळीपर्यंत उत्साहाचं वातावरण आहे. यादरम्यान, राज्यात ४८ जागा जिंकलेल्या भाजपाचं बळ आणखी वाढलं असून, दोन अपक्ष आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे.

Haryana Assembly Election 2024 Result: After the results in Haryana, BJP's half century is complete, two independent MLAs have given their support | हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा

हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा

हरयाणा विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवत भाजपानं या राज्यात विजयाची हॅटट्रिक साधली आहे. या विजयानंतर भाजपामध्ये राज्यापासून देशपातळीपर्यंत उत्साहाचं वातावरण आहे. यादरम्यान, राज्यात ४८ जागा जिंकलेल्या भाजपाचं बळ आणखी वाढलं असून, दोन अपक्ष आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे.

विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेले राजेश जून आणि देवेंद्र कादियान यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे हरयाणामधील प्रभारी धर्मेंद्र प्रधान आणि इतर भाजपा नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर दोन्ही आमदार भाजपामध्ये दाखल झाले.

देवेंद्र कादियान यांनी सोनीपत जिल्ह्यातील गन्नौर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांनी काँग्रेसच्या कुलदीप शर्मा यांचा ३५ हजार २०९ मतांनी पराभव केला. या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार देवेंद्र कौशिक हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. भाजपाने विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न दिल्याने नाराज झालेल्या देवेंद्र कादियान यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच गन्नौर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले.  दरम्यान, राजेश जून हे काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने बहादूरगड विधानसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढले होते. राजेश जून यांनी भाजपाचे उमेदवार दिनेश कौशिक यांना ४१ हजार ९९९ मतांनी पराभूत केले होते.

विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरयाणा विधानसभेमध्ये भाजपाने ४८, कांग्रेसने ३७, आयएनएलडी २ आणि ३ जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले होते. दरम्यान, दोन अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यामुळे राज्यात भाजपाचं संख्याबळ ५० वर पोहोचलं आहे. 

Web Title: Haryana Assembly Election 2024 Result: After the results in Haryana, BJP's half century is complete, two independent MLAs have given their support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.