मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 06:58 PM2024-10-05T18:58:16+5:302024-10-05T18:58:40+5:30
Haryana Assembly Election 2024:
हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान काही वेळापूर्वीच आटोपलं आहे. अत्यंत चुरशीच्या वातावरणामध्ये झालेल्या या मतदानादरम्यान, काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान, गुरुग्राममधील बरोदा येथील महमूदपूर गावात काँग्रेसला मतदान केल्याच्या रागातून एका मतदाराला काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मदन लाल नावाचे गृहस्थ मतदान केंद्रामधून मतदान केंद्रातून बाहेर आले तेव्हा त्यांना काही तरुणांनी घेरले. तसेच त्यांना लाठ्याकाठ्या घेऊन मारहाण केली. या प्रकरणी आता पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस अधिक तपासस करत आहेत.
महमूदपूर गावातील रहिवासी असलेले मदन लाल हे गृहस्थ त्यांच्या चार वर्षांच्या नातवासोबत मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेले होते. मदन लाल हे मतदान करून बाहेर आले तेव्हा तिथे उभ्या असलेल्या काही तरुणांनी त्यांना मत कुणाला दिलं? असं विचारलं, तेव्हा मदन लाल यांच्या नातवाने काँग्रेसचं नाव घेतलं. काँग्रेसचं नाव घेताच बाहेर उभ्या असलेल्या तरुणांनी मदनलाल यांना लाठ्याकाठ्या घेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते घटनास्थळावरून फरार झाले. गंभीर जखमी झालेल्या मदनलाल यांना उपचारांसांठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना अधिक उपचारांसाठी खानपूर महिला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, मारहाण झालेले मदन लाल यांनी सांगितले की, मारहाण करणारे तरुण गावातीलच रहिवासी होते. मी त्यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. माझ्यासोबत माझा नातू होता. तो केवळ ४ वर्षांचा आहे. त्याला मतदान काय असतं ते माहिती नाही. गावातील कमल नावाच्या तरुणाने मारहाण केली. त्याच्यासोबत काही लोक होते. मात्र मारहाण केवळ कमल नावाच्या तरुणानेच केली. दरम्यान, हरियाणामधील इतर काही भागातही हिंसाचार झाल्याची माहिती समोर येत आहे.