400 पारचा नारा खोटा होता, माझे स्वतःचे कार्यकर्ते नसते तर हारलो असतो! भाजप खासदाराचा घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 04:28 PM2024-06-06T16:28:15+5:302024-06-06T16:29:02+5:30
भाजप नेते राव इंद्रजित सिंह यांनी आपल्याच पक्षाच्या 400-पार घोषणेवर हल्ला चढवला आहे...
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये एनडीएला अपेक्षित यश मिळाले नाही. या निवडणुकीत भाजपने एनडीएसाठी ४०० पारचा नारा दिला होता. मात्र प्रत्यक्षात एनडीएला केवळ २९२ जागा मिळाल्या. अर्थात एनडीएला बहुमत (272) मिळाले आहे. एकट्या भाजपचा विचार करता, या निवडणुकीत भाजपला २४० जागा मिळाल्या असून तो बहुमतापासून (२७२) दूर राहिला आहे. यानंतर आता भाजप नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री राव इंद्रजित सिंह यांनी आपल्याच पक्षाच्या 400-पार घोषणेवर हल्ला चढवला आहे. 400 पारचा नारा खोटा होता, असे त्यांनी म्हटले आहे.
राव इंद्रजित सिंह म्हणाले, टीव्हीवाले मला विचारत होते की 400 पार होईल का, तर मी कसे बोलणार? यावेळी त्यांनी भाजपच्या हरियाणा युनिटवरही प्रश्न उपस्थित केले आणि सर्व काही ठीक नसल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर, ग्रामीण भागात माझे कार्यकर्ते नसते तर कदाचित मी ही निवडणूक हरलो असतो, असेही राव इंद्रजित यांनी म्हटले आहे.
राव इंद्रजीत यांनी गुडगाव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते राज बब्बर यांचा पराभव करत 80 हजारहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे, मात्र, त्यांच्या विजयाचे अंतर गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत बरेच कमी झाले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी 3 लाखांहून अधिक मते मिळवली होती. तर २०१४ मध्ये तिरंगी लढत होऊनही त्यांना मोठ्या प्रमाणावर मते मिळाली होती.
जुण्या विरोधकांचा सामना -
राव 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यानंतर त्यांचे काही जुने विरोधकही भाजपमध्ये आले आहेत. ही संख्या सुमारे सहा ते आठ एवढी आहे. यांपैकी काही खासदार तर काही आमदारपदाचे दावेदार आहेत. या नेत्यांनी पक्षासाठी व्यासपीठावर येऊन एकजूट दाखवली नाही. भाजपचे प्रमुख नेते ही जागा सर्वात सुरक्षित मानत होते, मात्र राज बब्बर यांच्या विरोधात ही जागा जिंकण्यासाठी राव यांना बरीच मेहनत करावी लागली.