हरयाणात भाजप दलित नेत्याला उपमुख्यमंत्री करणार का? राजकीय चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 01:40 PM2024-10-10T13:40:42+5:302024-10-10T13:41:03+5:30
Haryana : भाजप हरयाणात उपमुख्यमंत्री सुद्धा बनवण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे.
हरयाणामध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सरकार बनविणारा पक्ष ठरला आहे. विधानसभेच्या ९० भाजपनं ४८ जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेसनं ३७ जागा जिंकल्या. २०१४ नंतर हरयाणात भाजपनं स्वबळावर पहिल्यांदाच बहुमत मिळवलं आहे. भाजप हरयाणात नवं सरकार स्थापन करण्यासाठी आणि मुख्यमंत्री नेमण्यासाठी घाई करत नाही. तसंच नवीन सरकारचं धोरण काय असणार, याबाबत फारसं काही समोर आलेलं नाही. दरम्यान, भाजप हरयाणात उपमुख्यमंत्री सुद्धा बनवण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, भाजपकडून याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेलं नाही.
हरयाणात भाजप दलित नेत्याला उपमुख्यमंत्री बनवू शकते, अशी चर्चा आहे. दिल्लीत प्रदेशाध्यक्षांनीही या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. सरकार स्थापनेबाबत प्रसारमाध्यमांमध्ये जी तारीख प्रसारित केली जात आहे, ती राष्ट्रीय नेतृत्वानं निश्चित केलेली नाही. तारीख निश्चित झाल्यावर सर्वांना कळवू, असं भाजप प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडौली यांनी सांगितलं. तसंच, उपमुख्यमंत्रीपदाबाबत मोहनलाल बडौली म्हणाले की, उपमुख्यमंत्री करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आणि सध्या मीडियामध्ये काहीही सुरू आहे, तर पक्षाकडून अद्याप काहीही ठरलेलं नाही. तसंच काँग्रेसच्या पराभवाचं कारण भ्रष्टाचार, घराणेशाही आणि प्रादेशिकवाद असून जनतेनं त्यांना नाकारलं आहे.
दरम्यान, नायबसिंह सैनी हरयाणाचे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. कारण त्यांच्या चेहऱ्यावर भाजपनं निवडणूक लढवली होती. अशा परिस्थितीत त्यांच्याशिवाय उपमुख्यमंत्री होणार का? विशेष म्हणजे युतीच्या मजबुरीमुळं गेल्या टर्ममध्ये भाजपला दुष्यंत चौटाला यांना उपमुख्यमंत्री बनवावं लागलं होतं. मात्र, याआधी हरियाणात उपमुख्यमंत्री झाले नव्हते. दरम्यान, हरयाणात मुख्यमंत्रीसह एकूण १४ मंत्री केले जाऊ शकतात.
सरकार स्थापनेबाबत दिल्लीत विचारमंथन सुरू
हरयाणात नवे सरकार स्थापनेबाबत भाजप हायकमांडमध्ये चर्चा सुरू आहे. नायबसिंह सैनी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले होते. यानंतर अमित शाह, मनोहर लाल खट्टर आणि इतर नेत्यांची त्यांनी भेट घेतली होती. मुख्यमंत्री बनवण्याच्या प्रश्नावर नायबसिंह सैनी म्हणाले की, मला दिलेली जबाबदारी मी पूर्ण केली असून आता भाजपचे संसदीय मंडळ मुख्यमंत्र्यांबाबत निर्णय घेईल.
उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त
गुरुवारी नायबसिंह सैनी यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि त्यांच्या निधनानं दु:ख झाल्याचं सांगितलं. दुसरीकडं, हरयाणाचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानी मनोहर लाल खट्टर यांनी नायबसिंह सैनी यांच्यासह पक्षाचे प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली होती. १५ ऑक्टोबरला हरयाणात नवं सरकार स्थापन होऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.