अजब झोल! कार घराखाली उभी अन् श्रीनगरमध्ये गेला टोल; पावती पाहून मालक हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 03:03 PM2021-12-22T15:03:56+5:302021-12-22T15:04:13+5:30
कार पार्किंगमध्ये आणि ११० रुपयांचा टोल गेला; मेसेज पाहून कार मालक चक्रावला
सोनीपत: घरात कार असताना श्रीनगरच्या टोल नाक्यावरून शुल्क कापण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शुल्क कापण्यात आल्याचा मेसेज मोबाईलवर पाहून कार मालकाला धक्काच बसला. आपल्या नंबरवर दुसरं वाहन चालवली जात असावी अशी शंका मालकाला आली. त्यानंतर त्यानं सेक्टर २७ च्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हरयाणाच्या सोनीपतमधील रेवाडी येथे वास्तव्यास असलेले मुनीराम सरकारी सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यांच्याकडून मारुती सुझुकीची इग्निस कार आहे. कारला फास्टॅग आहे. २० डिसेंबरला त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला. श्रीनगरच्या टोल नाक्यावरून ११० रुपये टोल गेल्याची माहिती मेसेजमध्ये होती.
एचआर ३६ एएफ ६२०७ क्रमांकाची कार संध्याकाळी ५ वाजून ५२ मिनिटांनी टोल नाक्यावरून गेल्याची माहिती मेसेजमध्ये होती. मेसेजमध्ये ट्रान्झॅक्शन आयडीदेखील होता. ११० रुपयांचा टोल गेल्याची माहितीदेखील होती. त्यानंतर मुनीराम यांच्या फास्ट स्टॅग खात्यात ३४० रुपये शिल्लक राहिले.
श्रीनगर सोडा, आपण कितीतरी दिवस कार घेऊन आसपासदेखील गेलो नसल्याचं मुनीराम यांनी सांगितलं. कार घराखाली पार्किंगमध्ये उभी असल्याचंही ते म्हणाले. आपल्या कारचा नंबर असलेलं वाहनं कोणीतरी वापरत असावं अशी शंका त्यांना आहे. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.