आणखी एका मुख्यमंत्र्याला नारळ? थेट मोदींनी दिल्लीत बोलावलं; तासभर झालेल्या बैठकीत नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 07:32 PM2021-09-16T19:32:01+5:302021-09-16T19:33:07+5:30
उत्तराखंड, कर्नाटक, गुजरातपाठोपाठ आणखी एका राज्यात मुख्यमंत्री बदलणार?; चर्चांना उधाण
नवी दिल्ली: कर्नाटक, उत्तराखंड, गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्री बदलले. पैकी उत्तराखंड आणि गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता भाजप आणखी एका राज्याचे मुख्यमंत्री बदलण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेटीसाठी दिल्लीत बोलावलं. खट्टर यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन मोदींची भेट घेतली. जवळपास तासभर ही बैठक सुरू होती. त्यामुळे दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर खट्टर गृहमंत्री अमित शहांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेण्याचीदेखील शक्यता आहे. मात्र खुद्द खट्टर यांनी त्याचा इन्कार केला आहे. पंतप्रधान मोदींना त्यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या. राज्यात सुरू असलेल्या अनेक योजनांचा तपशील मोदींना दिला, असं खट्टर यांनी सांगितलं. हरयाणात गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्याची माहितीदेखील खट्टर यांनी पंतप्रधानांना दिली.
काँग्रेसकडून टॅलेंट हंट सुरू! दोन तरुण नेते पक्षात प्रवेश करणार?; राहुल गांधींसोबत बैठकांचं सत्र सुरू
हरयाणाचे मुख्यमंत्री बदलणार?
बरोदा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. त्याशिवाय सोनीपत, अंबालातील नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला. शेतकरी आंदोलनांमुळे हरयाणात भाजप बॅकफूटवर आला आहे. याशिवाय मुख्यमंत्री खट्टर आणि गृहमंत्री अनिल वीज यांच्यातील वाद सातत्यानं वाढत असून तो नेतृत्त्वापर्यंत पोहोचला आहे.
पाचवा मुख्यमंत्री बदलणार?
गेल्या ६ महिन्यांत भाजपनं ३ राज्यांत ४ मुख्यमंत्री बदलले आहेत. उत्तराखंडमध्ये दोनवेळा मुख्यमंत्री बदलले गेले. कर्नाटक, गुजरातमध्येही मुख्यमंत्री बदलण्यात आले. त्यामुळे आता हरयाणातही भाजपकडून भाकरी फिरवली जाऊ शकते. मुख्यमंत्री म्हणून खट्टर यांची दुसरी टर्म आहे.