"हा 'आप'चा कार्यकर्ता आहे, त्याला मारहाण करून हाकलून द्या"; हरियाणाचे मुख्यमंत्री संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 09:13 AM2023-05-15T09:13:51+5:302023-05-15T09:23:26+5:30
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे सोशल मीडियावर दोन व्हिडीओ व्हायरल झाल्याने ते वादात सापडले आहेत.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे सोशल मीडियावर दोन व्हिडीओ व्हायरल झाल्याने वादात सापडले आहेत. सिरसा येथे आयोजित केलेल्या 'जनसंवाद कार्यक्रमात' मुख्यमंत्री व्यसनमुक्तीबाबत सूचना मागवत होते. याच दरम्यान, एका व्यक्तीने त्यांना सवाल विचारला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्याला आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता म्हणून संबोधले आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्याला मारहाण करून बाहेर काढण्याचे आदेश दिले.
व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री म्हणतात, "आम्ही अंमली पदार्थांचे व्यसन कमी करण्यासाठी खूप काम केले आहे, त्यामुळे अमली पदार्थांचे व्यसन कमी करण्यासाठी काय करायला हवे याविषयी एक-दोन सूचना, कोणी देऊ शकत असेल तर सांगा." दरम्यान, एका व्यक्तीने मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला, त्यानंतर त्यांचा संयम सुटला आणि म्हणाले, 'मित्रांनो राजकारण करू नका, हा राजकारण करणारा आहे. आपचा कार्यकर्ता आहे. त्याला उचला, मारा आणि बाहेर काढा..."
सुरक्षा कर्मचारी त्या व्यक्तीला उचलून बाहेर काढत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दुसरीकडे, दुसरी घटनाही सिरसा येथील आहे, जिथे तक्रार घेऊन पोहोचलेल्या महिलेला मुख्यमंत्री म्हणत आहेत, "थांब, थांब जरा, तुला कुठून तरी शिकवून पाठवलं आहे, गप्प बस आता." हे दोन्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या दोन्ही व्हिडीओवरून विरोधक सरकारवर टीका करत आहेत.
दोन्ही घटना सिरसाच्या जाहीर सभेत घडल्या. सार्वजनिक संवादादरम्यान, लोक त्यांच्या तक्रारी मुख्यमंत्री खट्टर यांच्याशी शेअर करतात आणि ते अधिकाऱ्यांना त्यांच्या समस्या जागेवर सोडवण्याचे निर्देश देतात. आता मुख्यमंत्र्यांचा संयम सुटल्याचे दोन व्हिडिओ समोर आल्यानंतर सरकारवरच प्रश्न उपस्थित होत आहेत. आम आदमी पक्षाने या दोन्ही घटनांबाबत सीएम खट्टर यांच्यावर टीका केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.