हरयाणा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी १५ ऑक्टोबरला?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 09:12 AM2024-10-12T09:12:23+5:302024-10-12T09:12:30+5:30
त्याची पूर्वतयारी सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
चंडीगड : हरयाणात सलग तिसऱ्यांदा सत्ता राखणाऱ्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा १५ ऑक्टोबरला पंचकुला येथे शपथविधी होण्याची शक्यता आहे. त्याची पूर्वतयारी सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
हरयाणामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपने ४८ जागा जिंकल्या. काँग्रेसला तिथे सत्तेवर येण्याची आशा होती. मात्र, त्या पक्षाला फक्त ३७ जागा जिंकता आल्या. त्या राज्यात अपक्षांनी ३ व आयएनएलडी पक्षाने २ जागा जिंकल्या आहेत. हरयाणातील निवडणूक निकालांबद्दल काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. तिथे ईव्हीएममध्ये अनेक विसंगती आढळून आल्याची तक्रार काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे केली होती. हरयाणातील भाजपचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी शक्यता आहे. त्या राज्यातील विधानसभा निवडणुकांत भाजपने तिसऱ्यांदा यश मिळविल्यानंतर सैनी यांनी दिल्लीत जाऊन नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. मात्र, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील कळू शकलेला नव्हता. हरयाणाचे नवे मुख्यमंत्री कोण याबाबत भाजपने अद्याप कोणतीही जाहीर घोषणा केलेली नाही. (वृत्तसंस्था)