haryana election 2019 : भाजपाचं स्वप्न भंगलं; बहुमताच्या अलीकडेच अडली बीजेपी, साथ देणार का 'जेजेपी'?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 08:08 PM2019-10-24T20:08:51+5:302019-10-24T20:09:29+5:30
एकतर्फी विजय मिळवून हरयाणात सत्तास्थापनेसाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या भाजपाला आज जोरदात धक्का बसला आहे.
चंदिगड - एकतर्फी विजय मिळवून हरयाणात सत्तास्थापनेसाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या भाजपाला आज जोरदात धक्का बसला. आज झालेल्या हरयाणा विधानसभेच्या मतमोजणीचा कौल त्रिशंकू लागला असून, भाजपाला ४० जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत ३० जागांवर विजय मिळवला आहे. हरयाणामध्ये जननायक जनता पार्टी किंगमेकर ठरली असून, जननायक जनता पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत. तर इतरांच्या खात्यात १० जागा गेल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत राज्यातील १० पैकी १० जागा जिंकल्यानंतर भाजपाने राज्यात ७५ हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवले होते. मात्र आज मतमोजणीमधून समोर आलेले निकाल भाजपासाठी धक्कादायक होते. अखेर अटीतीच्या झुंजीनंतर भाजपाची गाडी ४० जागांवर जाऊन अडली. त्यामुळे राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरूनही ९० सदस्य असलेल्या हरयाणा विधानसभेत बहुमतासाठी भाजपाला ६ जागा कमी पडल्या.
जेजेपी किंगमेकरच्या भूमिकेत
दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीने पहिल्याच निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. जननायक जनता पक्षाचे एकूण १० उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे त्रिशंकू विधानसभेत जेजेपी किंगमेकरच्या भूमिकेत पोहोचला आहे.