हरयाणा निवडणूक 2019: मुख्यमंत्री खट्टर यांनी सायकलवरून जात केलं मतदान, हुड्डांकडून पूजा-अर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 02:38 PM2019-10-21T14:38:54+5:302019-10-21T14:42:03+5:30
हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
चंदीगडः हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. करनालमधल्या प्रेमनगर इथल्या बूथ क्रमांक 174वर सीएमनी सायकलवरून येत मतदान केलं आहे. त्यानंतर त्यांनी जनतेला शांततेत मतदान करण्याचं आवाहन केलं. तर दुसरीकडे हुड्डा यांना मतदान करण्यापूर्वी पूजा-अर्चा केली आहे. तसेच बहारदूरगडमधल्या झज्जर रोडवरच्या फाऊंडेशन स्कूलमधल्या मतदान केंद्राबाहेर काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दोन्ही गटांना वेगवेगळे करून पोलिसांनी जमावाला शांत केलं. निवर्तमानचे आमदार आणि भाजपा उमेदवार नरेश कौशिक यांचे भाऊ, पुतणे आणि भाच्यावर मारहाण आणि धमकी देण्याचे आरोप करण्यात आले आहेत. दुसरीकडे जननायक जनता पार्टीचे (जेजेपी) अध्यक्ष दुष्यंत चौटाला यांनी आपल्या कुटुंबीयांसह सिरसा येथील मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी दुष्यंत चौटाला हे ट्रॅक्टर चालवत मतदान केंद्रावर पोहोचले. त्यांच्यासोबत नैना चौटाला आणि मेघना चौटाला उपस्थित होत्या.
सोनाली-योगेश्वर दत्त यांनी केले मतदान
हरयाणा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कुमारी शैलजा यांनी सकाळी आठ वाजत हिसार येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. तसेच, टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांनी आदमपूरमध्ये मतदान केले. सोनाली फोगाट या आदमपूर मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार कुलदीप विश्नोई रिंगणात उतरले आहेत. याशिवाय, ऑलिम्पिकपटू योगेश्वर दत्त सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. योगेश्वर दत्तला भाजपाने उमेदवारी दिली आहे. योगेश्वर दत्त याने बारौदामध्ये मतदान केले. त्याच्या विरोधात काँग्रेसचे कृष्ण हुड्डा निवडणुक लढवत आहेत.
गीता-बबिता फोगाट यांनी बजावला मतदानाचा हक्क
महिला कुस्तीपट्टू बबिता फोगाट आणि गीता फोगाट यांनी आपल्या कुटुंबीयांसह चरखी दादरी मतदारसंघात असलेल्या बलाली गावात मतदान केले. बबिता फोगाट भाजपाच्या उमेदवार आहेत. चरखी दादरी मतदारसंघातून बबिता फोगाट यांच्याविरोधात काँग्रेस नेता नृपेंद्र सिंह सांगवान आणि जेजेपीचे नेते सतपाल सांगवान निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विधानसभेच्या 90 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली असून या निवडणुकीत 1169 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.