शेतकरी आक्रमक! हरियाणाच्या उपमुख्यमंत्र्यांचे हेलिपॅड शेतकऱ्यांनी उखडून टाकले
By मोरेश्वर येरम | Published: December 24, 2020 05:38 PM2020-12-24T17:38:50+5:302020-12-24T17:40:31+5:30
शेतकरी आंदोलकांनी हाती फावडा आणि कुदळ घेऊन हेलिपॅडची जागा खोदून ठेवली. इतकंच नाही, तर 'दुष्यंत चौटाला गो बॅक'च्या घोषणा देखील शेतकऱ्यांनी दिल्या.
नवी दिल्ली
हरियाणाच्या जिंद जिल्ह्यात उचाना येथे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या आगमनासाठी बनविण्यात आलेल्या 'हेलिपॅड'ची जागा शेतकऱ्यांनी उखडून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे.
शेतकरी आंदोलकांनी हाती फावडा आणि कुदळ घेऊन हेलिपॅडची जागा खोदून ठेवली. इतकंच नाही, तर 'दुष्यंत चौटाला गो बॅक'च्या घोषणा देखील शेतकऱ्यांनी दिल्या. दुष्यंत कुमार आज याच ठिकाणी हेलिकॉप्टरने दाखल होणार होते. पण शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता त्यांनी आपला दौरा रद्द केला आहे.
जोवर दुष्यंत चौटाला शेतकऱ्यांना समर्थन देत नाहीत. तोवर त्यांना जिल्ह्यात येऊ देणार नाही, अशी भूमिका जिंद येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे. दुष्यंत चौटाला यांनी राजीनामा देऊन शेतकरी आंदोलनात सहभागी व्हावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या ठिकाणी इतर कुणीही राजकीय नेता आला तर याच पद्धतीनं विरोध करण्यात येईल, असंही आंदोलक शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना दाखवले होते काळे झेंडे
नव्या कृषी कायद्यांना विरोध करत अंबाला येथे याआधी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या ताफ्याला शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले होते.
मुख्यमंत्र्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी यावेळी १३ शेतकऱ्यांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करुन घेण्यात आला आहे. यामुद्द्यावरुन देखील राजकारण तापलं असून काँग्रेसने हरियाणा सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.