OM Prakash Chautala : माजी मुख्यमंत्री चौटाला वयाच्या 87 व्या वर्षी 10वी, 12वी उत्तीर्ण; अभिषेक बच्चननं केलं अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 07:19 PM2022-05-11T19:19:03+5:302022-05-11T19:40:26+5:30
खरे तर चौटाला यांनी 2019 मध्ये 10वीचे पेपर दिले होते. मात्र, काही कारणामुळे ते इंग्रजीचा पेपर देऊ शकले नव्हते. यामुळे इंग्रजी विषयाचा निकाल येऊ न शकल्याने हरियाणा बोर्डाने त्याचा 12वीचा निकाल राखून ठेवला होता.
शिक्षणाला वयाचे बंधन नसते, हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री तथा इंडियन नॅशनल लोकदलचे सर्वेसर्वा चौधरी ओम प्रकाश चौटाला (OM Prakash Chautala) यांनी सिद्ध केले आहे. चौटाला यांनी सोमवारी वयाच्या 87 व्या वर्षी हरियाणा बोर्डाकडून दहावी आणि बारावीची गुणपत्रिका मिळवली आहे. चौटाला महाराणा प्रतापांच्या 428व्या जयंती निमित्त आयोजित एका कार्यक्रमात प्रमुख पाहुने म्हणून उपस्थित होते. येथेच हरियाणा बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी चौटाला यांना 10वी आणि 12वीचे गुणपत्रक देऊन त्यांचा सन्मान केला.
खरे तर चौटाला यांनी 2019 मध्ये 10वीचे पेपर दिले होते. मात्र, काही कारणामुळे ते इंग्रजीचा पेपर देऊ शकले नव्हते. यामुळे इंग्रजी विषयाचा निकाल येऊ न शकल्याने हरियाणा बोर्डाने त्याचा 12वीचा निकाल राखून ठेवला होता. यानंतर, ऑगस्ट 2021 मध्ये त्यांनी पुन्हा इंग्रजीचा पेपर दिला आणि 88 गुण मिळवले.
अभिषेक बच्चननं केलं अभिनंदन -
गेल्या 7 एप्रिल 2022 रोजी माजी मुख्यमंत्री चौटाला यांच्या जीवनाशी मिळता जुळता 'दसवी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात एका जाट नेत्याची कथा आहे. अभिषेक बच्चनने एका न्यूज पोर्टलची बातमी शेअर करत ओम प्रकाश चौटाला यांचे अभिनंदन केले आहे. तसेच, #दसवी असेही म्हटले आहे.