रॉबर्ट वड्रा यांच्या कंपनीला हरियाणा सरकारची नोटीस
By admin | Published: October 21, 2015 02:12 AM2015-10-21T02:12:18+5:302015-10-21T02:12:18+5:30
हरियाणा सरकारने कर आकारणी करण्याच्या उद्देशाने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्या मालकीच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटीज या कंपनीला मंगळवारी
चंदीगड : हरियाणा सरकारने कर आकारणी करण्याच्या उद्देशाने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्या मालकीच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटीज या कंपनीला मंगळवारी एक नोटीस जारी करून डीएलएफसोबत झालेल्या गुडगावमधील जमीन सौद्याचा तपशील मागविला आहे.
‘आम्ही गुडगावच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटीजला कारणे दाखवा नोटीस जारी केलेली आहे आणि डीएलएफसोबत झालेल्या व्यवहाराचा तपशील मागितला आहे,’ असे हरियाणाचे अबकारी शुल्क आणि कर निर्धारण अधिकारी प्रतापसिंग यांनी फोनवरून सांगितले. स्कायलाईट हॉस्पिटॅलिटीजला उत्तर सादर करण्यासाठी २६ आॅक्टोबरपर्यंतची मुदत दिलेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)
काय आहे नोटीस?
कंपनीला गुडगाव येथे व्यावसायिक प्रकल्प विकसित करण्यासाठी २००८ मध्ये परवाना मंजूर करण्यात आला होता; परंतु नंतर हा परवाना डीएलएफ कंपनीला ५८ कोटी रुपयांत विकण्यात आल्याची माहिती मिळाली. तसेच डीएलएफला जमीनही विकण्यात आली, असे सांगण्यात आले आहे. डीएलएफला विकण्यात आलेली जमीन व परवान्याचे एकूण मूल्य किती आहे, याचा तपशील सादर करावा,’ असे या नोटिशीत म्हटले आहे.