'मुलांकडे ३० कोटींची संपत्ती, मला २ भाकरीही नाहीत'; IASच्या आजी-आजोबांची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 09:03 AM2023-04-01T09:03:44+5:302023-04-01T09:04:43+5:30
वृद्ध दाम्पत्याचा असा करुण शेवट झाला, हे पाहून पोलिसही हेलावले.
चंडीगड : घरची परिस्थिती चांगली असूनही कुटुंबीयांकडून दुर्लक्ष होत असल्याने किंवा त्यांच्याकडून छळ होत असल्याने, वयोवृद्धांचे हाल होत असल्याच्या बातम्या आपण अनेक वेळा वाचतो, परंतु हरयाणातील चरखी दादरी येथील घटना खरोखरच मन सुन्न करणारी आहे. येथे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्याच्या आजी-आजोबांनी रोज पुरेसे जेवणही मिळत नाही, म्हणून जीवन संपविले.
वृद्ध दाम्पत्याचा असा करुण शेवट झाला, हे पाहून पोलिसही हेलावले. सुसाइड नोटच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी संबंधित कुटुंबातील मुलगा, दोन सुना आणि पुतण्या या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मूळचे गोपी येथील रहिवासी असलेले जगदीश चंद्र आणि भागली देवी हे त्यांचा मुलगा वीरेंद्र यांच्या जवळ बढडा येथे राहत होते.
वीरेंद्र आर्य यांचा मुलगा विवेक आर्य २०२१ मध्ये आयएएस झाला असून, त्याला हरयाणा कॅडर मिळाली आहे. वृद्ध दाम्पत्याने बुधवारी रात्री त्यांच्या बढडा येथील राहत्या घरी विषारी पदार्थ खाल्ला. यानंतर, रात्री उशिरा साधारणपणे अडीच वाजण्याच्या सुमारास याबाबतची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला देण्यात आली.
मरण्यापूर्वी वृद्ध दाम्पत्याने पोलिसांना दिली सुसाइड नोट
प्रकृती बिघडल्याने वृद्ध दाम्पत्याला प्रथम बढडा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने, त्यांना दादरी सिव्हिल हॉस्पिटलला पाठविण्यात आले. मात्र, येथे दादरी रुग्णालयातील डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. जगदीशचंद्र यांनी मृत्युपूर्वी सुसाइड नोट पोलिसांना दिली.
काय आहे सुसाइड नोटमध्ये?
सुसाइड नोटमध्ये जगदीश चंद्र यांनी म्हटले आहे, “मी जगदीश चंद्र आर्य तुम्हाला माझी व्यथा सांगतो. माझ्या मुलांची बढड्यात ३० कोटींची संपत्ती आहे, पण मला देण्यासाठी त्यांच्याकडे दोन भाकरीही नाहीत. मी माझ्या धाकट्या मुलासोबत राहत होतो. ६ वर्षांपूर्वी त्याचे निधन झाले. काही दिवस त्याच्या पत्नीने भाकरी दिली, पण नंतर तिचे पुतण्याबरोबर संबंध असल्याने त्यांनी मला मारहाण करून घराबाहेर काढले. मी दोन वर्षे अनाथाश्रमात राहिलो आणि परत आलो, तर त्यांनी घराला कुलूप लावले. या काळात माझ्या पत्नीला अर्धांगवायू झाला आणि आम्ही दुसऱ्या मुलासोबत राहू लागलो. त्यानेही ठेवण्यास नकार दिला आणि शिळ्या भाकरी व खराब दही द्यायला सुरुवात केली. हे विष किती दिवस खाणार, म्हणून मी सल्फासची गोळी खाल्ली.