हरयाणातील दहाही लोकसभा जागांवर हरयाणा जनचेतना पार्टीने दिला भाजपला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 10:18 AM2024-05-17T10:18:31+5:302024-05-17T10:19:34+5:30
माजी केंद्रीय मंत्री विनोद शर्मा यांच्या घोषणेने खळबळ
अंबाला : माजी केंद्रीय मंत्री व हरयाणा जनचेतना पार्टीचे अध्यक्ष विनोद शर्मा यांनी राज्यातील १० लोकसभा जागांवर भाजपला पाठिंबा देण्याची गुरुवारी घोषणा केल्याने हरयाणाच्या राजकारणात खळबळ माजली आहे. शर्मा यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या आयोजिलेल्या बैठकीत ही घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यामुळे मी प्रभावित झालो आहे. मोदी यांच्या अंत्योदय विचारधारेमुळे समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांना विविध योजनांचा लाभ मिळत आहे, असेही विनोद शर्मा यांनी सांगितले.
हरयाणा जनचेतना पार्टी राज्यातील सर्व लोकसभा जागांवर भाजपला पाठिंंबा देणार आहे. यापूर्वी २०१४ व २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्येही हरयाणा जनचेतना पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचे समर्थन केले होते. राज्यसभा खासदार कार्तिकेय शर्मा म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या पाठीशी आज सारा देश उभा आहे. ते तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान बनणार हे निश्चित आहे. आयुष्मान कार्ड, पीएम आवास योजना व अन्य योजनांचा लाभ तळागाळातल्या लोकांना मिळाला आहे. विकासासाठी सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ द्यायला हवी, असे आवाहनही कार्तिकेय शर्मा यांनी केले.