तिकिट कापलं म्हणून नाराज मंत्री मुख्यमंत्र्यांना हात न मिळवताच पुढे निघून गेले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 09:44 AM2024-09-06T09:44:42+5:302024-09-06T09:48:02+5:30
हरियाणा विधानसभेत भाजपाकडून ६७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यातून अनेक नेत्यांची नाराजी उफाळून आली आहे.
नवी दिल्ली - हरियाणा विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तिकिट वाटपावरून नाराज भाजपाच्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम करणं सुरू केले आहे. त्यातच हरियाणाचे माजी मंत्री कर्णदेव कंबोज यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत पदाचा राजीनामा दिला. कंबोज यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री नायब सिंग सैनी स्वत: त्यांची समजूत काढण्यासाठी पोहचले परंतु त्यांना अपमानास्पद व्हावं लागलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तिकिट न मिळाल्याने नाराज कर्णदेव कंबोज यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी गेलेले मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला तेव्हा कंबोज हे हात जोडून पुढे निघून गेले. मुख्यमंत्री नायब सैनी आणि आमदार सुभाष सुधा हे नाराज कंबोज यांना भेटण्यासाठी त्यांच्या गावी पोहचले होते. मात्र पक्षाने उमेदवारी न दिलेल्या कंबोज यांनी आता भाजपाचा पराभव करण्यासाठी काम करू असा एल्गार पुकारला.
भाजपावर टीका, कंबोज भडकले
हरियाणा विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारलेले कंबोज म्हणाले की, भाजपानं पहिली यादी जाहीर केली, मी इंद्री आणि रादौर या २ मतदारसंघातून लढण्याची तयारी केली होती परंतु उमेदवारी मिळाली नाही. मला पक्षाला विचारायचंय, अशी काय मजबुरी होती म्हणून २०१९ ला श्याम सिंह राणा यांचं तिकिट कापलं आणि इतकी गद्दारी करून २०२४ ला पुन्हा त्यांनाच तिकिट देण्यात आले? पक्षाने मला उत्तर द्यावे. जर मी समाधानी झालो तर पक्षाचा प्रचार करेन परंतु ज्यारितीने षडयंत्र करून माझे तिकिट कापण्यात आले. ज्याने पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला, जो माणूस आम्हाला शिव्या देतो त्याला पक्षाने तिकिट दिले आणि आम्हाला नाही, या प्रकाराने पक्षातील कार्यकर्ता नाराज आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच पंतप्रधानांनी ओबीसी समाजाचा सन्मान केला, परंतु प्रदेश भाजपानं ओबीसीचा सन्मान केला नाही. त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. मी २ विधानसभा मतदारसंघात तयारी केली, तिकिट एकाच जागेवर मिळणार होते, परंतु आम्ही दुसऱ्या जागेवर पक्षाच्या उमेदवाराला जिंकवण्याचं काम केले असते. परंतु कुठल्याही जागेवर उमेदवारी दिली नाही. भाजपा आता या दोन्ही जागा हरेल, जर हरणार नसेल तर आम्ही दोन्ही जागेवर भाजपाचा पराभव करण्यासाठी काम करू असं कंबोज यांनी इशारा दिला.
दरम्यान, हरियाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी भाजपाने ६७ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. परंतु यादीची घोषणा होताच भाजपातील अनेक नेत्यांची नाराजी समोर आली. अनेक नेत्यांना पक्षाचा राजीनामा दिला. काहींनी अपक्ष निवडणुकीत उभे राहण्याची घोषणा केली. ऊर्जा आणि जल मंत्री रणजितसिंह चौटाला आणि आमदार लक्ष्मण दास नापासह मोठ्या संख्येने अनेक नेत्यांनी उमेदवारी न मिळाल्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. राज्यात ५ ऑक्टोबरला एका टप्प्यात मतदान होणार असून ८ ऑक्टोबरला निकाल लागणार आहे.