हरियाणातील आमदार राकेश दौलताबाद यांचं निधन, सकाळी आला होता हृदयविकाराचा झटका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 04:13 PM2024-05-25T16:13:34+5:302024-05-25T16:14:00+5:30
Rakesh Daulatabad passed away: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज हरियाणामधील सर्व १० जागांवर मतदान होत आहे. दरम्यान, राज्यात मतदान सुरू असतानाच गुरुग्राममधील बादशाहपूर येथील अपक्ष आमदार राकेश दौलताबाद यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज हरियाणामधील सर्व १० जागांवर मतदान होत आहे. दरम्यान, राज्यात मतदान सुरू असतानाच गुरुग्राममधील बादशाहपूर येथील अपक्ष आमदार राकेश दौलताबाद यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. राकेश दौतलाबाद यांना सकाळी १०.३० च्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना पालम विहार येथील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्यावर काही काळ उपचार करण्यात आले. मात्र, त्यांचे प्राण वाचू शकले नाही. राकेश दौलताबाद यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बादशाहपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारा म्हणून भाजपाच्या मनीष यादव यांचा पराभव करून विजय मिळवला होता.
हरियाणामधील सध्याच्या राजकीय उलथापालथीदरम्यान, राकेश दौतलाबाद हे भाजपाला पाठिंबा देत होते. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी राकेश दौलताबाद यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. बादशाहपूरचे आमदार आणि विधानसभेतील आमचे सहकारी राकेश दौलताबाद यांच्या आकस्मिक निधनामुळे मला धक्का बसला आहे. त्यांच्या अकाली जाण्याने हरियाणाच्या राजकारणामध्ये एकप्रकारचं शून्यत्व आलं आहे, अशा शब्दात नायब सिंह सैनी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
दरम्यान, गुरुग्राम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार राज बब्बर यांनीही राकेश दौतलाबाद यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राकेश दौलताबाद यांच्या निधनामुळे मला धक्का बसला आहे. त्यांचा हसतमुख चेहरा माझ्या नजरेसमोरून हटत नाही आहे. या दु:खद प्रसंगातून सावरण्याचं बळ त्यांच्या कुटुंबीयांना मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा शब्दात राज बब्बर यांनी राकेश दौतलाबाद यांना श्रद्धांजली वाहिली आहे.