बापरे! वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून फक्त 4 दिवसांत 1.41 कोटींची दंडवसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 10:35 AM2019-09-06T10:35:37+5:302019-09-06T10:43:42+5:30

नवीन तरतुदीनंतर आता तब्बल 1 कोटी 41 लाख 22 हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे. 

Haryana, Odisha Police Collects Rs 1.41 Lakh in Fine Within 4 Days of New Motor Vehicles Bill | बापरे! वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून फक्त 4 दिवसांत 1.41 कोटींची दंडवसुली

बापरे! वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून फक्त 4 दिवसांत 1.41 कोटींची दंडवसुली

Next
ठळक मुद्देनवीन तरतुदीनंतर आता तब्बल 1 कोटी 41 लाख 22 हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे. ओडिशात नियम लागू झाल्यापासून 4,080 चलनांद्वारे 88 लाख 90 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.हरियाणामध्ये 343 जणांकडून तब्बल 52 लाख 32 हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे

नवी दिल्ली - भारतात 1 सप्टेंबरपासून नवीन मोटार वाहन कायदा लागू झाला आहे. नवीन कायद्यातंर्गत वाहतुकीचे नियम मोडल्यास जवळपास 30 पटीने अधिक दंड वाढविण्यात आला आहे. त्यामुळे कार, बाईक चालविताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहनधारकांना दंड भरावा लागतो. या नवीन तरतुदीनंतर आता तब्बल 1 कोटी 41 लाख 22 हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे. 

हरियाणा आणि ओडिशा या दोन राज्यांत मिळून केवळ चार दिवसांत 1.41 कोटी रुपये  दंडवसुली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्यांवर चाप बसविण्यासाठी वाहतुकीचे नियम तयार करण्यात आले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशा मोटार वाहन विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात वाहतुकीचे नवे नियम लागू झाल्यापासून 4,080 चलनांद्वारे 88 लाख 90 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच 46 वाहनं जप्त करण्यात आली आहेत.

हरियाणामध्ये देखील अशाच प्रकारे दंड वसूल करण्यात आला आहे. 343 जणांकडून तब्बल 52 लाख 32 हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे. तर दिल्लीमध्ये नवा वाहन कायदा लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी वाहतूक विभागाच्या पोलिसांनी 3900 जणांवर कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. भारतात वाहतुकीचे नियम तोडल्यास असणारा दंड अधिक असल्याचं येथील लोकांना वाटतं. मात्र इतर देशात वाहतुकीचे नियम तोडल्यास असणारी रक्कम ही जास्त आहे. भारताप्रमाणे इतरही देशात वाहतुकीचे नियम तयार करण्यात आले आहेत. सुरक्षित वाहतूक व्यवस्था राखण्यासाठी दंडाची रक्कम ठरवण्यात आलेली असते. विविध देशात ही रक्कम वेगवेगळी आहे. हाँगकाँग, अमेरिका, जर्मनी, जपान, सिंगापूरमध्ये नियम तोडल्यास असणारी दंडांची रक्कम ही लाखांमध्ये आहे. 

भारतात जर तुम्ही विना परवाना गाडी चालवत असाल तर 5 हजार रुपये दंड भरावा लागेल. त्याचसोबत दारुच्या नशेत गाडी चालविली तर 10 हजार रुपये भरावे लागणार आहेत. तर हे नियम मोडल्यामुळे तुमचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द होईल आणि तुम्हाला जेलची हवा खावी लागणार आहे. जर अल्पवयीन मुलाने गाडी चालवून अपघात केल्यास, त्याच्या पालकांना 3 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, तसेच त्या वाहनाची नोंदणीही रद्द केली जाणार आहे. 

भारतात वाहतुकीचे नियम मोडल्यास 15 हजारापर्यंत दंड तर 2 वर्षाची शिक्षा   

सामान्य दंडाची रक्कम - पूर्वी 100 रुपयांवरून आता 500 रुपये 

हेल्मेट न घालता गाडी चालविणे - पूर्वी 100 रुपये दंड होता तर आता 1 हजार रुपये दंड आणि 3 महिने परवाना निलंबित 

विना परवाना गाडी चालविणे - पूर्वी 500 रुपये दंड होता तर आता 5 हजार रुपये 

दुचाकीवर तीन जणांनी प्रवास केला तर पूर्वी 100 रुपये दंड होता तर आता 2 हजार रुपये दंड आणि 3 महिने वाहन परवाना निलंबित करण्याची शिक्षा 

सीट बेल्ट न घालता गाडी चालविणे - पूर्वी 100 रुपये दंड होता तर आता 1 हजार रुपये 

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे - पूर्वी 1 हजार रुपये दंड होता तर आता 5 हजार रुपये 

भरधाव वेगाने वाहन चालविल्यास - पूर्वी 400 रुपये दंड होता तर आता पहिल्यांदा पकडल्यास हलक्या वाहनांवर 1 ते 2 हजार रुपये दंड तर जड वाहनांना 2 ते 4 हजार रुपये दंड आकारण्यात येईल, आणि दुसऱ्यांदा पकडल्यास परवाना जप्त करण्यात येणार आहे. 

रॅश ड्रायव्हिंग - पहिल्यांदा 6 महिने ते 1 वर्षांपर्यंत जेल आणि 1 हजार ते 5 हजार दंड तर दुसऱ्यांदा 2 वर्षापर्यंत जेल आणि 10 हजार रुपये दंड

 दारू पिऊन गाडी चालविल्यास - पहिल्यांदा 6 महिने जेल आणि 10 हजार रुपये दंड तर दुसऱ्यांदा 2 वर्ष जेल आणि 15 हजार रुपये दंड 
 

Web Title: Haryana, Odisha Police Collects Rs 1.41 Lakh in Fine Within 4 Days of New Motor Vehicles Bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.