भरधाव ट्रकनं आंदोलक शेतकरी महिलांना चिरडलं; ३ मृत्यूमुखी, ३ गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 09:46 AM2021-10-28T09:46:44+5:302021-10-28T09:47:00+5:30
हरयाणात तीन आंदोलक महिलांचा अपघाती मृत्यू; तिघींची प्रकृती गंभीर
बहादूरगढ: हरयाणाच्या बहादूरगढमध्ये अपघात झाला आहे. एका भरधाव ट्रकनं आंदोलक शेतकरी महिलांना चिरडलं आहे. यामध्ये तीन वृद्ध महिलांचा मृत्यू झाला असून तीन महिलांची प्रकृती गंभीर आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे.
आज सकाळी साडे सहा वाजता झज्जर रोडवर अपघात झाला. वृद्ध महिला रस्त्यावर असलेल्या दुभाजकावर बसल्या होत्या. तितक्यात एक भरधाव ट्रक आला. या ट्रकनं महिलांना चिरडलं. दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तीन महिलांची प्रकृती गंभीर आहे.
दुभाजकावर बसलेल्या महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. मृत्यूमुखी पडलेल्या तिन्ही महिला पंजाबच्या मानसा जिल्ह्याच्या रहिवासी आहेत. घरी जाण्यासाठी महिला रिक्षाची वाट पाहत होत्या. त्यासाठी त्या दुभाजकावर बसल्या होत्या. तितक्यात झज्जर रोडवर उड्डाणपुलाच्या खाली एका भरधाव ट्रकनं त्यांना चिरडलं. अपघातानंतर परिसरात खळबळ माजली. पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात नोव्हेंबर २०२० पासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. यामध्ये पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांचं प्रमाण लक्षणीय आहे. या महिलादेखील त्याच आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. आंदोलक शेतकरी टप्प्याटप्प्यानं घरी जातात. वृद्ध महिला आंदोलन स्थळावरून घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र त्याआधी त्यांना मृत्यूनं गाठलं.