दिल्ली, पंजाबनंतर आणखी एका राज्यात आपने मारली मुसंडी, भाजपाला दिला जबरदस्त धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 02:39 PM2022-11-28T14:39:29+5:302022-11-28T14:40:32+5:30
Haryana Panchayat Election Result: दिल्ली आणि पंजाबनंतर आता आणखी एका राज्यात आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारत भाजपाला धक्का दिला आहे. आम आदमी पक्षाने हरिणायातील पंचायत निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या अनेक जागांवर आम आदमी पक्षाने विजय मिळवला आहे.
चंडीगड - अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेत भाजपाचं टेन्शन वाढवलं आहे. दरम्यान, दिल्ली आणि पंजाबनंतर आता आणखी एका राज्यात आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारत भाजपाला धक्का दिला आहे. आम आदमी पक्षाने हरिणायातील पंचायत निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या अनेक जागांवर आम आदमी पक्षाने विजय मिळवला आहे.
हरियाणामधील पंचायत निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. या निकालामध्ये भाजपा, आम आदमी पक्ष आणि आयएनएलडीच्या उमेदवारांनी जिल्हा परिषदेच्या अनेक जागांवर विजय मिळवला. त्याबरोबरच अनेक अपक्षांनीही विजय मिळवला. हरियाणामधील सत्ताधार भाजपाने सात जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदेच्या १०२ जागांपैकी २२ जागा जिंकल्या. यमुनानगर, अंबाला आणि गुरुग्राममध्ये भाजपाने जागा जिंकल्या. मात्र पंचकुला जिह्यात भाजपाला १० जागांवर पराभव पत्करावा लागला.
आम आदमी पक्षाने या निवडणुकीतील कामगिरीतून सर्वांना धक्का दिला. आपने सिरसा, अंबाला, यमुनानगर आणि जिंदसह इतर जिल्ह्यात मिळून १५ जागा जिंकल्या. आम आदमी पक्षाने जिल्हा परिषदेच्या सुमारे १०० जागांवर उमेदवार दिले होते.
दरम्यान, आनएनएलडीने ७२ जागा लढवून त्यापैकी १४ जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेसने चिन्हावर निवडणूक लढवली नव्हती. मात्र पक्षाने ज्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. त्यापैकी अनेकांनी विजय मिळवला. तसेच अनेक अपक्षही निवडून आले आहेत.