पंचकुलामधील हिंसाचार प्रकरणी हरियाणा पोलिसांनी जारी केली मोस्ट वॉन्टेड लिस्ट, हनीप्रीतचं नाव टॉप वर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 12:24 PM2017-09-18T12:24:50+5:302017-09-18T12:45:09+5:30
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमला कोर्टाने 20 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनाविल्यानंतर हरियाणामध्ये झालेल्या हिंसा आणि हत्येच्या प्रकरणात राज्य पोलिसांनी मोस्ट वॉन्टेड लिस्ट काढली आहे.
चंदीगड, दि. 18- डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमला कोर्टाने 20 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनाविल्यानंतर हरियाणामध्ये झालेल्या हिंसा आणि हत्येच्या प्रकरणात राज्य पोलिसांनी मोस्ट वॉन्टेड लिस्ट काढली आहे. या लिस्टमध्ये राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतचं नाव सगळ्यात टॉप वर आहे. हरियाणा पोलिसांनी एकुण 43 जणांच्या नावाची लिस्ट जारी केली आहे. डेरा सच्चा सौदाचा प्रवक्ता आदित्या इन्साचंही नाव या यादीमध्ये आहे. हनीप्रीत आणि आदित्य हे दोघेही सध्या फरार आहेत. हनीप्रीत विरूद्ध लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. तसंच हनीप्रीतला शोधण्यासाठी नेपाळपासून बिहारच्या जवळील जिल्ह्यांमध्ये तपास केला जातो आहे. तसंच हनीप्रीतचे पोस्टर्सही लावण्यात आले आहेत. राम रहीमला दोषी ठरविल्यानंतर झालेल्या हिंसेत सरकारी मालमत्तेचं मोठं नुकसान झालं होतं. तसंच यावेळी माध्यमांनाही लक्ष करण्यात आलं होतं. काही वृत्तवाहिन्यांच्या ओबी व्हॅनची जाळपोळ करण्यात आली होती. यानंतर राज्यात सुरक्षा व्यवस्था जास्त कडक करण्यात आली होती.
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीम याला बलात्काराच्या आरोपाबद्दल सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवताच पंजाब व हरियाणात त्याच्या समर्थकांनी ठिकठिकाणी जाळपोळ, दगडफेक सुरू केली. त्यांनी २00 हून अधिक वाहनं, अनेक रेल्वे स्थानकं, पेट्रोल पंप, टेलिफोन एक्स्चेंज, प्राप्तिकर कार्यालय, दूध प्रकल्प यांना आग लावली. दिल्लीत एका ट्रेनच्या बोगीही पेटवली. या हिंसाचारामुळे पोलीस व सुरक्षा दलांनी तिथे आधी लाठीमार, नंतर पाण्याचा मारा व अश्रुधूर सोडला. तरीही हा जमाव त्यांच्या अंगावर येत होता. त्यामुळे अखेर केलेल्या गोळीबारात ३0 जण ठार व २५0 हून अधिक लोक जखमी झाले. राम रहीमला कोर्टाने दोषी ठरविल्याच्या दिवसापासून राम रहीमची दत्तक कन्या हनीप्रीत इन्सा बेपत्ता आहे.
पंचकुलामध्ये हिंसा पसविण्याचा आरोप असलेल्यांची यादी जारी करण्यात आली आहे. या वॉन्टेड लिस्टमध्ये असणाऱ्या व्यक्तीबद्दल माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवलं जाणार आहे, असं नोटीसमध्ये म्हंटलं आहे. तसंच या वॉन्टेड आरोपींनी माहिती घेण्यासाठी विशिष्ट फोन नंबर, व्हॉट्सअॅप नंबर आणि इमेल आयडी प्रसिद्ध केले जाणार आहेत. सिरसामध्ये हिंसा परसविणाऱ्यांची माहिती फोटोग्राफ आणि व्हिडीओच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. फोटो आणि व्हिडीओमध्ये हल्लेखोर शस्त्र घेऊन दिसत होती तर काही जणांनी चेहरा झाकला होता.
डेराचा कार्यकर्ता प्रदीप गोयल इन्सा आणि प्रवक्ता आदित्य इन्साचे नातेवाईक प्रकाश या दोघांना आधीच अटक करण्यात आली होती. या दोघांच्या जबानीवरून पोलीस हनीप्रीतवर आणखी जास्त आरोप लावू शकतात.
राम रहीमची निकटवर्तीय आणि दत्तक मुलगी हनीप्रीतविरोधात लूकआऊट नोटीस जारी
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याची दत्तक मुलगी हनीप्रीत सिंगविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. हनीप्रीत सिंग सध्या फरार असून हरियाणा पोलिसांनी ही नोटीस जारी केली. न्यायालयाने गुरमीत राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर त्याला पळवून नेण्याचा कट आखल्याचा आरोप हनीप्रीत सिंगवर करण्यात आला. पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली असल्याने हनीप्रीत सिंग देश सोडून जाऊ शकत नाही.पोलिसांनी डेरा सच्चा सौदाचा प्रवक्ता आदित्य इन्साविरोधातही अशीच नोटी जारी केली आहे. राम रहीमला दोषी ठरवण्यात आल्यानंतर हिंसा भडकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काहीजणांनी हनीप्रीत फरार असल्याचं सांगितलं आहे. तर काही रिपोर्टनुसार, रोहतकमधील एका अनुयायाच्या घरात ती राहत आहे. राम रहीमला बलात्काराच्या आरोपात दोषी ठरवल्यानंतर न्यायालयाच्या आवारातून पळवून नेण्याचा तसंच हिंसा भडकवल्याचा आरोप हनीप्रीतवर आहे