हरियाणाचे लोक आता काश्मीरमधून नवरी आणू शकतात, मुख्यमंत्री खट्टर यांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 04:43 AM2019-08-11T04:43:16+5:302019-08-11T04:43:58+5:30
हरियाणाचे लोक आता काश्मीरमधून नवरी आणू शकतात, असे विधान करून हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.
चंदीगड : हरियाणाचे लोक आता काश्मीरमधून नवरी आणू शकतात, असे विधान करून हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. काश्मीरमधील ३७० कलम हटविल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले आहे.
खट्टर यांनी शुक्रवारी फतेहाबाद येथे एका कार्यक्रमात हे विधान केले. ते म्हणाले की, जर मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असेल तर, अडचणी येतात. आमचे सहकारी ओ. पी. धनखडजी म्हणाले होते की, नवरी मुलगी बिहारहून आणावी लागेल. पण, काही जण म्हणाले, काश्मीर खुले झाले आहे. त्यामुळे नवरी मुलगी काश्मीरमधून आणली जाईल. यातील विनोदाचा भाग सोडून दिला तर, प्रश्न असा आहे की, मुला-मुलींच्या संख्येत समानता राहिली तर, समाजात संतुलन कायम राहील.
विशेष म्हणजे, धनखड यांनी २०१४ मध्ये असे विधान केले होते की, जर हरियाणात मुलांना योग्य जोडीदार मिळत नसेल तर, ते बिहारमधून त्यांच्यासाठी नवरी मुलगी आणतील. हरियाणात मुला- मुलींच्या संख्येत विषमता असल्याने मुलांच्या विवाहाचा प्रश्न अनेकदा गंभीर बनलेला आहे.
आरएसएसच्या विचारसरणीचा परिणाम : राहुल गांधी
काश्मिरी महिलांबाबत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलेले वक्तव्य म्हणजे आरएसएसचे प्रशिक्षण एका व्यक्तीच्या विचाराला कसे वळण देतात याचे उदाहरण आहे, असे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.
राहुल गांधी यांनी टष्ट्वीट केले आहे की, खट्टर यांचे वक्तव्य निंदणीय आहे. महिला काही संपत्ती नाही की, पुरुष त्यांच्यावर मालकीहक्क सांगू शकेल.