सायकलस्वार डीएसपींचा रस्ते अपघातात मृत्यू, अज्ञात वाहनाने दिली धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 10:20 PM2023-03-04T22:20:20+5:302023-03-04T22:20:43+5:30
याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे.
हरयाणातील हिसार येथे शनिवारी संध्याकाळी एका रस्ते अपघातात डीएसपी चंद्रपाल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. डीएसपी चंद्रपाल फतेहाबादच्या रतियामध्ये तैनात होते. सायकलवरून जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यानंतर त्यांना उपचारासाठी अग्रोहा मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फतेहाबादच्या रतियामध्ये तैनात डीएसपी चंद्रपाल हे सायकलिंगसाठी गेले होते. आग्रोहाकडे जात असताना अज्ञात वाहनाने सायकलस्वार डीएसपी चंद्रपाल यांना पाठीमागून धडक देऊन घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली आणि गंभीर जखमी डीएसपी चंद्रपाल यांनी उपचारासाठी अग्रोहा मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागातील अनेक अधिकारी डीएसपींना पाहण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे. डीएसपी चंद्रपाल हे रोज सायकल चालवत होते. तसेच, रतियापूर्वी डीएसपी चंद्रपाल यांची पोस्टिंगही वाहतूक पोलिसात होती, असे सांगण्यात येते. याआधीही ते भट्टू पोलीस ठाण्यात तैनात होते.
रोज करत होते सायकलिंग
डीएसपी चंद्रपाल हे रोज अनेक किलोमीटर सायकल चालवत होते. वाहनाच्या धडकेने त्यांच्या सायकलचे मोठे नुकसान झाले. त्याची सायकल, हेल्मेट आणि पाण्याची बाटली रस्त्याच्या कडेला पडून होती.