हरियाणा पोलिसांना मिळाली राम रहीमला तुरुंगातून पळवण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 12:39 PM2017-10-10T12:39:42+5:302017-10-10T12:41:00+5:30
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमीत राम रहिमला तुरुंगातून पळवण्यासाठी हरियाणा पोलिसांना धमकीचा फोन आला आहे.
हरियाणा- डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमीत राम रहिमला तुरुंगातून पळवण्यासाठी हरियाणा पोलिसांना धमकीचा फोन आला आहे. हरियाणाचे डीजीपी बी. एस. संधू यांना एका निनावी व्यक्तीनं फोन करत रोहतकमधल्या सुनारिया तुरुंगात कैद असलेल्या गुरुमीत राम रहिमला तुरुंगातून पळून जाण्यास मदत करा, अशी धमकी दिली आहे. तसेच राम रहिमची तुरुंगातून सुटका करा, अशीही धमकीवजा मागणही त्या व्यक्तीनं केली आहे. तुम्ही राम रहिमची 72 तासांत सुटका न केल्यास त्याला आम्ही तुरुंगातून पळवून नेऊ, असंही आव्हानही त्या निनावी फोन करणा-या व्यक्तीनं पोलिसांना दिलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार पोलीस महासंचालकांनी राज्याचे गृहसचिव एस. एस. प्रसाद व मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना धमकीच्या फोनचीही माहिती दिली आहे. मात्र संधू यांनी सार्वजनिकरीत्या असा फोन आल्याचं वृत्त फेटाळलं आहे. संधू यांना रविवारी मध्यरात्री हा फोन आला होता. हरिणायातील सायबर क्राइम पोलिसांनी लोकेशन ट्रेस केल्यानंतर समजलं की, सिमकार्ड ब्रिटनचं असलं तरी फोन चंदीगड सेक्टर 11मधून आला होता. ज्या नंबरवरून फोन करण्यात आला तो नंबर सध्या बंद आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार पोलीस महासंचालक व गृहसचिवांनी सुनारिया तुरुंगाच्या सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. पोलीस महासंचालकांनी वरिष्ठ अधिका-यांसोबत बैठक घेतली असून, रोहकतच्या डीसी, एसपी व जेल अधीक्षकांना आवश्यक सूचना जारी केली आहे. तसेच तुरुंगाचे संचालक डॉ. के. पी. सिंह यांच्याशीही या फोनसंदर्भात संधू यांनी चर्चा केली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमीत राम रहिम याला दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सध्या त्याला रोहतक येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे राम रहिम तुरुंगात काम करत असेल, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले. मात्र, त्याला तुरुंग प्रशासनाने भाजी लागवडीचे काम दिले आहे. यासाठी त्याला दिवसातील 8 तास काम केल्याबद्दल 20 रुपयांची मजुरी मिळणार आहे.
परिसरात छोटीशी जमीन आहे. त्याठिकाणी राम रहिम भाजीपाला लागवडीचे काम करणार असल्याची माहिती तुरुंग विभागाचे महासंचालक के. पी. सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले, राम रहिमने आधीच भाजीपाला लागवडीच्या कामाची जबाबदारी स्वीकारली आहे. जे काही भाजीपाल्याचे उत्पादन राम रहिम घेईल, त्याचा उपयोग तुरुंगातील मेसमध्ये करण्यात येणार आहे. याचबरोबर, त्याच्याकडे तुंरुग परिसरात असलेल्या झाडांची छाटणी करण्याचेही काम देण्यात आले आहे. त्यामुळे त्यासाठी त्याला रोज आठ तासांसाठी 20 रुपयांचा मोबदला मिळणार आहे. त्याला देण्यात आलेले हे काम अकुशल कामकाजाच्या वर्गात मोडते. तसेच, त्याला कोणतीही व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जात नाही. इतर कैद्यांप्रमाणेच त्याला ठेवण्यात आले आहे, असेही के. पी. सिंह म्हणाले.