टोळधाडीचा हल्ला परतवण्यासाठी हरयाणा सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 01:03 AM2020-06-29T01:03:04+5:302020-06-29T01:03:24+5:30

मागील दीड महिन्यापासून टोळधाड पाकिस्तानमधून राजस्थानमध्ये हवेच्या प्रवाहाबरोबर येत आहेत

Haryana ready to repel locust attack | टोळधाडीचा हल्ला परतवण्यासाठी हरयाणा सज्ज

टोळधाडीचा हल्ला परतवण्यासाठी हरयाणा सज्ज

Next

चंदीगड : टोळधाडीचा हल्ला परतवण्यासाठी हरयाणा पूर्णपणे सज्ज आहे, असे हरयाणाचे कृषिमंत्री जे.पी. दलाल यांनी रविवारी म्हटले आहे. रेवाडी जिल्ह्यात टोळधाडीचा हल्ला वेळीच परतवून लावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुकही केले. दरम्यान, त्या जिल्ह्यात टोळधाडीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचा आदेशही त्यांनी दिला.

मागील दीड महिन्यापासून टोळधाड पाकिस्तानमधून राजस्थानमध्ये हवेच्या प्रवाहाबरोबर येत आहेत. ही टोळधाड एका राज्यातून दुसºया राज्यात जात असून, त्यांच्या मार्गात येणारी पिकेही नष्ट करीत आहेत. यापूर्वी मे महिन्यात टोळधाडीने राजस्थानमध्ये हल्ला केला होता. त्यानंतर पंजाब, गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेशात पिकांचे मोठे नुकसान केलेले आहे. दलाल यांनी म्हटले आहे की, टोळधाडीच्या हल्ल्यातून पिके वाचविण्यासाठी आमच्याकडे कीटकनाशक व यंत्रांचा पुरेसा साठा आहे. टोळधाड पीक, झाडे व जमिनीवर बसताच आमचे अधिकारी तात्काळ कारवाई करतात. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता रेवाडीमध्ये टोळधाडीने प्रवेश केला होता.

रात्री जाटुसाना गावात त्यांचा मुक्काम होता. त्यावेळी प्रशासनाला ३५ टक्के टोळधाड हटविण्यात यश आले. आम्हाला वाटले होते की, टोळधाड रोहतक व सोनिपतकडे सरकतील; परंतु हवेच्या प्रवाहाने त्यांची दिशा बदलली. त्यामुळे टोळधाड गुरुग्राम, दिल्ली व पुन्हा उत्तर प्रदेशकडे सरकली. टोळधाडीच्या हल्ल्यामुळे नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे, तसेच हानी झालेल्या शेतकºयांना योग्य मोबदला दिला जाणार आहे. दरम्यान, टोळधाडीचा हल्ला परतवून लावण्यात राज्य सरकार अपयशी ठरले, असा आरोप काँग्रेसने केला होता. तो कृषिमंत्री जे.पी. दलाल यांनी फेटाळून लावला.

ढोल, भांडे वाजविण्याचे आवाहन

  • टोळधाड घालवण्यासाठी लोकांनी ढोल, भांडे वाजवावेत, तसेच मोठ्या आवाजात संगीत वाजवावे किंवा फटाके वाजवावेत.
  • टोळधाड बहुतांश करून दिवसा हल्ला करतात व रात्री आराम करतात. त्यामुळे त्यांना रात्री आराम करू दिला जाऊ नये.

Web Title: Haryana ready to repel locust attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.