Sandeep Singh Haryana Minister: "देश सोडलास तर 1 कोटी देईन", महिला प्रशिक्षकाचा मंत्री संदीप सिंग यांच्यावर आणखी एक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 02:19 PM2023-01-04T14:19:43+5:302023-01-04T14:20:39+5:30
हरयाणाचे मंत्री संदीप सिंग यांच्या छळ आणि विनयभंग प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.
नवी दिल्ली : हरयाणाचेमंत्री संदीप सिंग यांच्या छळ आणि विनयभंग प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. याप्रकरणी चंदीगड पोलिसांच्या एसआयटीने महिला प्रशिक्षकाची तब्बल 8 तास चौकशी केली. एसआयटीसमोर हजर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना महिला प्रशिक्षक म्हणाली की, "केस मागे घेण्यासाठी मला एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे."
माझ्यावर गप्प राहण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे संबंधित महिला प्रशिक्षिकेने म्हटले. "मला देश सोडून दुसऱ्या देशात जाण्यास सांगणारे फोन येत आहेत. त्यासाठी एका महिन्यासाठी एक कोटी रुपये मिळतील. मला माझी तक्रार मागे घेण्यास सांगितले जात आहे, तर गप्प बस नाही तर कोणत्या दुसऱ्या देशात जा असे सांगितले जात आहे", असा आरोप महिला प्रशिक्षकाने केला आहे. याशिवाय मी आज सकाळी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य ऐकले आणि ते स्वत: संदीप सिंग यांचा बचाव करत आहेत असेही संबंधित महिला प्रशिक्षकाने म्हटले.
कलम 164 नोंदवले जाईल - वकील
महिला प्रशिक्षकाचे वकील दिपांशू बन्सल यांनी म्हटले, "मागील आठ तासांपासून प्रश्नांची उत्तरे दिली जात आहेत. माझ्याकडे जे काही पुरावे होते ते आम्ही आधीच पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. फोनही पोलिसांच्या हवाली करण्यात आला आहे. संदीप सिंग यांना अटक करण्यासाठी आम्ही पोलिसांना दोन ते तीन दिवसांचा कालावधी देऊ."
कागदपत्राच्या बहाण्याने फोन करून विनयभंग केल्याचा आरोप
दरम्यान, महिला प्रशिक्षकाने केलेल्या तक्रारीत कलम 354, 354A, 354B, 342, 506 IPC पोलीस स्टेशन सेक्टर 26, चंदीगड अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास केला जात आहे. हरयाणाच्या क्रीडा विभागात नियुक्त केलेल्या महिला प्रशिक्षकाने पत्रकार परिषदेत आरोप केला होता की, राज्याचे क्रीडा मंत्री संदीप सिंग यांनी एका कागदपत्राच्या बहाण्याने आपल्याला आपल्या शासकीय निवासस्थानी बोलावून विनयभंग केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"