वर्णिका कुंडू माझ्या मुलीसारखी, सुभाष बराला यांचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 06:31 PM2017-08-08T18:31:47+5:302017-08-08T18:33:48+5:30
हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला यानं चंदीगडमधल्या सेक्टर 9 येथून जात असताना वर्णिका कुंडू या मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढली होती
चंदीगड, दि. 8 - हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला यानं चंदीगडमधल्या सेक्टर 9 येथून जात असताना वर्णिका कुंडू या मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढली होती. मुलाच्या या कृत्यामुळे सुभाष बराला यांनाही विरोधकांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. आता सुभाष बराला यांनी वर्णिका कुंडू ही माझ्या मुलीसारखी आहे, असं म्हटलं आहे.
मुलाला वाचवण्यासाठी मी कोणतेही प्रयत्न करणार नाही. तसेच कायद्यानुसार त्याला शिक्षा होईल, असंही बराला म्हणाले आहेत. या प्रकरणात पहिल्यांदाच सुभाष बराला यांनी सार्वजनिकरीत्या प्रतिक्रिया दिलीय. कायदा आपलं काम करतोय. तसेच भाजपा हा महिलांचे अधिकार आणि स्वातंत्र्यासाठी आवाज उठवणारा पक्ष असल्याचंही ते म्हणाले आहेत. वर्णिका माझ्या मुलीसारखी असून, मुलाला वाचवण्यासाठी मी कोणतेही प्रयत्न केले नाहीत आणि करणारही नाही, असं बराला यांनी स्पष्ट केलं आहे.
चंदीगडमधील सेक्टर 9 येथून जात असताना वर्णिका कुंडू या मुलीचा दोन जणांनी पाठलाग करून तिच्यासोबत छेडछाड केल्याची घटना घडली होती. तेव्हा एक टाटा सफारी कार पाठलाग करीत आहे, असे तिच्या लक्षात आले. तिने तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. पोलिसांनी दोघांना अटक केली, तेव्हा ते दोघेही दारूच्या नशेमध्ये होते. हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला याने हा सगळा प्रकार केला होता. याप्रकरणी त्याला अटक झाली पण नंतर जामीन मिळाला. वर्णिका ही हरिणायाच्या आयएएस अधिका-याची मुलगी आहे. या प्रकरणी वर्णिका कुंडू हिने या संपूर्ण घटनेवर उत्तर दिलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी विकास बराला याला नशेत आकंठ बुडालेला गुंड म्हणत त्याच्याविरोधात याचिका दाखल करण्याची घोषणा केली होती. कुरुक्षेत्रातील भाजपाचे खासदार राजकुमार सैनी म्हणाले, बराला यांनी पक्ष कारवाईची वाट न पाहता तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. भाजपानंच बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा दिला आहे. हा कोणत्याही साधारण व्यक्तीवर नव्हे, तर पार्टी अध्यक्षाच्या मुलावर आरोप लावण्यात आला आहे. बराला यांनी तात्काळ पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे.
तर भाजपाचे खासदार किरण खेर म्हणाले, कोणालाही एखाद्या मुलीला घाबरवण्याचा कोणताही अधिकार नाही. काँग्रेसही या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे. काँग्रेसनं हरिणायाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालय हरियाणा भाजपाचे अध्यक्ष आणि त्यांच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. चंदीगड सरकार आणि पोलीस दोन्ही केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत आहे, असंही काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले आहेत. त्यामुळे विकास बराला याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात पोलिसांवरही नरमाईची भूमिका घेतल्याचा आरोप केला जातोय. पोलिसांनी या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यासाठी कायदेशीर सल्ल्याची मागणी केली आहे