नूह हिंसाचार: जमावाचा पोलीस स्टेशनवर दगडफेक आणि गोळीबार; FIR मध्ये धक्कादायक खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 04:09 PM2023-08-02T16:09:44+5:302023-08-02T16:10:05+5:30
Haryana Violence: पोलिसांची हत्या करण्याच्या उद्देशाने दगडफेक आणि गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे.
Haryana Violence: हरियाणातील नूहमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत 41 एफआयआर नोंदवण्यात आल्या असून, 120 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. नूह हिंसाचाराशी संबंधित एफआयआरमधून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत, ज्यात पोलिसांवर हत्या करण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्याची माहिती आहे.
एफआयआरमध्ये काय खुलासे झाले?
पोलीस निरीक्षक पंकज कुमार यांनी सोमवारी नूह येथे झालेल्या गोंधळानंतर एफआयआर दाखल केला, ज्यामध्ये त्यांनी अदबर चौकातील हिंसाचाराचा उल्लेख केला. एफआयआरमध्ये असे लिहिले की, 600-700 लोकांचा जमाव धार्मिक घोषणा देत पोलिसांच्या दिशेने आले आणि दगडफेक केली. जमावातील काही लोकांनी गोळीबारही सुरू केला, ज्यामध्ये एक गोळी पोलीस निरीक्षक अनिल कुमार यांच्या पोटात लागली. यानंतर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला.
अनेक ठिकाणी तोडफोड
एफआयआरमध्ये असेही म्हटले आहे की, 31 जुलै रोजी सायबर क्राईमच्या पोलिस स्टेशनवर जमावाने हल्ला केला, त्यादरम्यान पोलिस स्टेशनची भिंत आणि गेट तोडले. जमावाने अनेक खासगी आणि सरकारी वाहनेही जाळली. हिंसाचाराच्या वेळी हल्लेखोरांनी अनेक ठिकाणी तोडफोड केली. एवढंच नाही, तर दुकानांतून कुलर-इन्व्हर्टर, लॅपटॉपसह इतर अनेक वस्तू घेऊन पळ काढला.
मृतांचा आकडा 6 वर पोहोचला
नूहमधील हिंसाचारातील मृतांची संख्या आतापर्यंत 6 वर पोहोचली आहे. डीजीपी पीके अग्रवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, हिंसाचाराशी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली जाईल. दरम्यान, नूहपासून सुरू झालेला हिंसाचार गुरुग्रामपर्यंत पसरला आणि सोमवारी रात्री प्रचंड गोंधळ उडाला. मंगळवारी रात्री देखील गुरुग्रामच्या सेक्टर 70 मध्ये जाळपोळ झाली.