UPSC EXAM: प्रेरणादायी कहाणी! चार वर्षांच्या मुलाची आई अनू कुमारी यूपीएससी परीक्षेत आली दुसरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2018 08:31 AM2018-04-29T08:31:03+5:302018-04-29T08:49:27+5:30
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) निकाल जाहीर झाला असून, अनु कुमारी या देशात दुस-या आल्या आहेत. विशेष म्हणजे अनु कुमारी यांननी इन्श्युरन्स कंपनीतील नोकरी लाथाडत यूपीएससीची परीक्षा दिली आणि त्यांनी या परीक्षेत दुस-या येण्याचा मान मिळवला. परंतु एवढ्यावर त्यांची कहाणी थांबत नाही.
चंदीगड- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा (यूपीएससी) निकाल जाहीर झाला असून, अनू कुमारी या देशात दुस-या आल्या आहेत. अनू कुमारी यांनी इन्श्युरन्स कंपनीतील नोकरी लाथाडत यूपीएससीची परीक्षा दिली आणि त्यांनी या परीक्षेत दुस-या येण्याचा मान मिळवला. परंतु एवढ्यावर त्यांची कहाणी थांबत नाही. 31 वर्षीय अनू कुमारी हरियाणातल्या सोनीपतमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांचं लग्न झालं असून, त्यांना चार वर्षांचा मुलगा आहे.
अनू यांनी कुटुंब सांभाळत एवढं मोठं यश संपादन केल्यामुळे त्यांचं सर्वच स्तरांतून कौतुक केलं जातंय. अनू यांना भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू व्हायचं असून, महिला सक्षमीकरणासाठी त्यांना काम करण्याची इच्छा आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी नोकरी सोडून यूपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली. 2016मध्येही त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली होती. परंतु त्यावेळी त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. आताच्या परीक्षेत त्या उत्तीर्ण होऊन दुस-या आल्या आहेत.
मी या परीक्षेसाठी कोणताही क्लास लावला नव्हता. माझा ध्येय स्पष्ट होतं आणि मी ते साध्य केलं, असं अनूनं एका वृत्तवाहिनीला सांगितलं. अनू यांचे पती उद्योगपती आहेत. अनु यांनी दिल्ली विद्यापीठातून भौतिक शास्त्रात पदवी प्राप्त केली, तर नागपूरच्या आयएमटीमधून त्यांनी एमबीए पूर्ण केले. अनु यांनी तब्बल नऊ वर्षे खासगी कंपनीत काम केले. पण आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी अखेर नोकरीला रामराम ठोकत स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि आज त्या केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) परीक्षेत दुस-या आल्या आहेत.