हरियाणाच्या नूहची आग राजस्थानात पोहोचली, भिवाडीत अनेक दुकानांची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 09:06 PM2023-08-01T21:06:56+5:302023-08-01T21:08:29+5:30
हरियाणातील नूहमध्ये भडकलेल्या हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू झाला तर अनेक पोलिसही जखमी झाले.
हरियाणातील नूह जिल्ह्यातील भडकलेल्या हिंसाचाराची आग आता राजस्थानपर्यंत पोहोचली आहे. राजस्थानच्या भिवडीमध्येही मांसाच्या दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. भिवडीमध्ये अलवर बायपासवर असलेल्या मांसाच्या दुकानांची तोडफोड होत असल्याचे पाहून लोकांनी जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढला. हल्लेखोरांनी दुकानांची तोडफोड केल्यानंतर माल घेऊन पसार झाले.
पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिस येत असल्याचे पाहून हल्ला करणारे जेनेसिस शॉपिंग मॉलमध्ये घुसले. पोलिसांनी तत्काळ मॉलला चारही बाजूंनी वेढा घातला. सध्या पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून मॉलमध्ये शोधमोहीम सुरू आहे.
नूह हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू
हरियाणाच्या नूहमध्ये तणावाचे वातावरण असताना राजस्थानच्या भिवडीमध्ये दुकानांची तोडफोड करण्याची ही घटना समोर आली आहे. नूहमध्ये मिरवणूक रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर दोन समुदायांमध्ये दगडफेक झाली. नूह येथील हिंसाचारात दोन होमगार्डसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर डझनभर पोलिसही जखमी झाले आहेत. नूहची आग हळूहळू त्याच्या लगतच्या भागात पोहोचत आहे. नूहला लागून असलेल्या सोहना येथेही हिंसाचार झाल्याच्या बातम्या आल्या आहेत.
केंद्राकडून रॅपिड अॅक्शन फोर्सच्या 20 कंपन्या मागवल्या
नूह येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून केंद्रीय दलाच्या 15 कंपन्या हरियाणाला पाठवण्यात येत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकारने रॅपिड अॅक्शन फोर्सच्या 20 कंपन्या एका आठवड्यासाठी पाठवण्याची विनंती केंद्राला केली आहे. यासाठी केंद्रीय गृहसचिवांना पत्र लिहिले आहे.