पुरुष आमदाराची बदनामी झाली नाही का?; संजय राऊतांचा व्हायरल व्हिडिओवर खोचक सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 11:09 AM2023-03-14T11:09:58+5:302023-03-14T11:10:42+5:30
जर असा व्हिडिओ असेल तर त्यांचीही बदनामी झाली असेल. पुरुषाची बदनामी होत नाही का? असं राऊतांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली - शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरण महाराष्ट्रात सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकरणी विधानसभेत महिला आमदारांनी मुद्दा उचलून धरला. दोषींवर कारवाई करावी अशी मागणी या आमदारांनी केली. त्यानंतर ठाकरे गटाच्या युवा नेत्याला या प्रकरणी अटक झाली. त्यावर साईनाथ दुर्गेला झालेली अटक ही चुकीची असून कायद्याचा गैरवापर आहे. मला ते प्रकरण फारसं माहित नाही. जो व्हिडिओ आलाय तो खरा की खोटा याचा शोध घ्या असं सांगत संजय राऊतांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, व्हि़डिओ मॉर्फिंग झालंय की नाही त्याचा तपास करा. त्यासंदर्भातील पुरुष आमदाराची तक्रार आहे का? ते कुठे आहेत. बदनामी त्यांची झालीय. जर असा व्हिडिओ असेल तर त्यांचीही बदनामी झाली असेल. पुरुषाची बदनामी होत नाही का? आणि मिंदे गटातील महिलेचा आरोप माझी बदनामी झालीय. त्याबाबत खटले दाखल होऊ शकते. ही चित्रफित व्हायरल होतेय लाखो कोट्यवधी लोकांमध्ये जाते मग तुम्ही किती जणांना अटक करणार? SIT स्थापन करून चौकशी करावी. कुठल्याही महिलेची बदनामी होऊ नये. सन्मान व्हायला हवा. मग ते कुठलेही सरकार असो. पण काही गोष्टी राजकारणासाठी, राजकीय सूडबुद्धीने होत असतील तर त्याला राजकीय कृतीने उत्तर दिले जाऊ शकते असं त्यांनी सांगितले.
बाप पळवतात आता मुलंही पळवायला लागले
सुभाष देसाई हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते. त्यांचे चिरंजीव नाही. याबाबत सुभाष देसाईंनी सविस्तर निवेदन प्रसिद्ध केलेय. भूषण देसाईंचा कधीही शिवसेनेशी संबंध नव्हता. तो कधीही पक्षात सक्रीय नाही. पण हा मिंदे गट कधी बाप पळवतात आता मुलंही पळवायला लागले. पण ही मेगाभरती सुरु आहे ती कुचकामी आहे. मिंदे गटातील सामंत लोणीवाल्यांनी याच चिरंजीवाबद्दल काही आरोप केले. हेच ते. त्यांच्या चौकशीचे आदेश दिलेत असेही म्हटलं. पण त्यानंतरच त्याच चिरंजीवाला त्यांचे मुख्यमंत्री वॉशिंग मशिनमध्ये टाकून स्वच्छ करून बाजूला घेऊन बसलेत. कोकणातील जे मंत्री आहेत त्यांनी आरोप केले त्याचे काय झाले याचे उत्तर द्या असा संजय राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेला विचारलं आहे.