हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 07:32 AM2024-10-05T07:32:04+5:302024-10-05T07:32:54+5:30
हरयाणात शनिवारी ९० जागांवरील १,०३१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सील होणार आहे.
- बलवंत तक्षक
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली / चंडीगड : भाजपने हरयाणाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आरोप करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी राज्यातील जनता लवकरच भाजपच्या उद्योजक धार्जिण्या धोरणांचा ‘चक्रव्यूह’ तोडण्यासाठी त्यांना जोरदार धक्का देईल, अशी टीका केली. दरम्यान, हरयाणा विधानसभेसाठी शनिवारी मतदान होत असून, भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात आहे, तर काँग्रेस सत्ता हिसकावण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज आहे.
भाजपने पसरवलेल्या बेरोजगारीच्या आजाराने राज्यातील तरुणांचे भविष्य धोक्यात आणले आहे. काँग्रेस सरकार रोजगार निर्माण करील आणि प्रत्येक कुटुंब समृद्ध होईल याची काळजी घेईल, असे राहुल यांनी ‘एक्स’वर त्यांच्या नुकत्याच झालेल्या विजय संकल्प
यात्रेदरम्यान महिलांच्या गटाशी केलेल्या संवादाचा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे.
माजी खासदार अशोक तंवर काँग्रेसमध्ये दाखल
माजी खासदार अशोक तंवर यांनी शुक्रवारी अधिकृतपणे काँग्रेसमध्ये समावेश केला. यावेळी त्यांनी हरयाणातील सर्व घटकांना, विशेषत: दलित आणि मागासवर्गीयांना विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा जनादेश द्यावा, असे आवाहन केले. तंवर यांनी गुरुवारी हरयाणातील महेंद्रगड जिल्ह्यात राहुल गांधींच्या सभेत अनौपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
१०३१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सील होणार
हरयाणात शनिवारी ९० जागांवरील १,०३१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सील होणार आहे. निवडणुका निष्पक्ष आणि शांततेत पार पाडण्यासाठी २९ हजार ४६२ पोलिस, २१ हजार १९६ होमगार्ड, १० हजार ४०३ एसपीओ तैनात आहेत.
भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. यावेळी निवडणुकीत शेतकरी, सैनिक आणि पहिलवानांचे प्रश्न हेच प्रमुख मुद्दे राहिले आहेत. भाजप आणि काँग्रेसने निवडणूक प्रचारात एकमेकांवर जोरदार टीका केली.