भाजपच्या धक्कातंत्राची हॅटट्रिक, तीनही राज्यात नवे चेहरे; लोकसभेच्या तयारीचे दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 05:34 AM2023-12-13T05:34:57+5:302023-12-13T05:35:15+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच वेगळे निर्णय घेतात, असे म्हटले जाते.
संजय शर्मा
नवी दिल्ली : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांत मोहन यादव, विष्णुदेव साय व भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्रिपद देऊन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने तीन राज्यांत पिढी बदलली. तिन्ही नवीन मुख्यमंत्री ६० पेक्षा कमी वयाचे तर आहेतच; पण त्याचबरोबर पक्षाने अनेक संदेशही दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच वेगळे निर्णय घेतात, असे म्हटले जाते. हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर, गुजरातेत भूपेंद्र पटेल व उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणूक पराभूत झालेले पुष्करसिंह धामी यांना मुख्यमंत्रिपद देऊन पंतप्रधानांनी यापूर्वीच हा संदेश दिलेला आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री झालेले भजनलाल शर्मा हे ५६ वर्षांचे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचे वय ५८ वर्षाचे, तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचे वय ५९ आहे. म्हणजेच सर्व नेते ६० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. nराजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी जयपूर येथील भाजप मुख्यालयात आमदारांची बैठक सुरू होती.
nमंचावर माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या राजनाथ यांच्या उजव्या बाजूला बसल्या होत्या. काही वेळ दोघांमध्ये संवादही झाला. तेवढ्यात राजनाथ सिंह यांनी एक चिठ्ठी वसुंधरा यांना दिली. त्यांनी ती चिठ्ठी उघडू नये असे म्हटले. काही वेळाने वसुंधरा यांनी चिठ्ठी उघडताच त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले. हा क्षण व्हिडीओत कैद झाला.
छत्तीसगडमध्ये रमण सिंह, मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान, नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हादसिंह पटेल, कैलाश विजयवर्गीय व राजस्थानमध्ये वसुंधरा राजे, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुनलाल मेघवाल यांना मुख्यमंत्रिपद न देऊन पक्षाने स्पष्ट संदेश दिलेला आहे की, या सर्व ज्येष्ठांचे राज्यातील राजकारण आता संपलेले आहे. एक प्रकारे पिढीचा बदलच भाजपने या तीन राज्यांत केला आहे.
पहिल्यांदा आमदार अन् थेट मुख्यमंत्री
जयपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निकटवर्तीय आणि पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेले भजनलाल शर्मा यांची राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली. तर दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांची उपमुख्यमंत्रिपदी आणि वासुदेव देवनानी यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली.
जयपूर येथील भाजप मुख्यालयात केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून आलेले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित भाजप आमदारांची बैठक झाली. त्यावेळी माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी विधिमंडळाचे नेते म्हणून भजनलाल शर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राजस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले जाईल, अशी प्रतिक्रिया शर्मा यांनी दिली. त्यानंतर राजभवन येथे राज्यपाल कलराज मिश्र यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला. भजनलाल हे प्रदेश महासचिव असून, ते सांगानेर मतदारसंघातून ४८,०८१ मतांनी विजयी झाले.