घृणास्पद : एकीचे ‘आॅनर किलिंग’, दुसरीवर एकतर्फी प्रेमातून सूड
By admin | Published: March 7, 2016 03:56 AM2016-03-07T03:56:25+5:302016-03-07T03:56:25+5:30
पळून जाऊन परजातीत विवाह केला म्हणून माहेरी आलेल्या विवाहितेला तिच्या भावांनी राजस्थानात तर एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद दिला नाही म्हणून एका विद्यार्थिनीला तिच्याच गावातील तरुणाने आंध्र
राजस्थान, आंध्रात दोघींना जिवंत जाळले
जयपूर/ विजयवाडा : पळून जाऊन परजातीत विवाह केला म्हणून माहेरी आलेल्या विवाहितेला तिच्या भावांनी राजस्थानात तर एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद दिला नाही म्हणून एका विद्यार्थिनीला तिच्याच गावातील तरुणाने आंध्र प्रदेशात जिवंत जाळल्याच्या घटना घडल्या आहेत.
राजस्थानातील घटना शुक्रवारी डुंगरपूर जिल्ह्याच्या पतलासा गावात घडली. त्या गावच्या रजपूत समाजातील रामेश्वरी देवी उर्फ रामो या तरुणीने आठ वर्षांपूर्वी घरातून पळून जाऊन प्रकाश सेवक या ब्राह्मण मुलाशी विवाह केला होता. लग्नानंतर दोघेही वेगळे राहात होते. लग्नानंतर आठ वर्षांनी ती शुक्रवारी पहिल्यांदाच आपल्या तीन वर्षाच्या मुलाला घेऊन सासरी आली तेव्हा तिच्या सख्ख्या व चुलत भावांनी तिला जिवंत जाळले. या प्रकरणी पोलिसांनी लक्ष्मण सिंग व अन्य सहा जणांना शनिवारी अटक केली.
रामेश्वरीला तिचा भाऊ लक्ष्मण सिंग आणि परवीन सिंग तसेच चुलत भाऊ कल्याणसिंग, ईश्वर सिंग, महेंद्र सिंग, भूपाल सिंग आणि गजेंद्र सिंग यांनी मिळून जिवंत जाळले, अशी तक्रार रामेश्वरीची सासू कलावती हिने पोलिसात दाखल केली आहे. ४ मार्च रोजी कलावती, तिचा धाकटा मुलगा, सून आणि रामेश्वरी हे सर्व जण अंगणात बसले असताना लक्ष्मणसिंग हा अन्य ३० जणांसह तेथे आला. त्याने रामेश्वरीला मारहाण केली आणि ओढत बाजूच्या मंदिराजवळ नेले आणि तेथे तिच्या अंगावर केरोसिन ओतून तिला जिवंत जाळले.
आंध्र प्रदेशातील घटना पश्चिम गोदावरी जिल्ह्याच्या चतापरु गावात घडली. पैदला इंदुमती या १७ वर्षांच्या मुलीचा गावातील डी. चिन्ना बाबू हा तरुण गेले अनेक दिवस पिच्छा पुरवत होता.
यावरून इंदुमतीच्या घरच्या लोकांनी चिन्ना बाबूला काही दिवसांपूर्वी चोपही दिला होता. याचा सूड घेण्यासाठी शनिवारी इंदुमती एकटी असताना चिन्ना बाबू व त्याचा भाऊ पेड्डा बाबू घरात घुसले व त्यांनी रॉकेल ओतून तिला जाळले.
९० टक्के भाजलेल्या इंदुमतीला इस्पितळात हलविण्यात आले, पण तेथे तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्व जबानीत तिने चिन्ना व पेड्डा बाबू यांची नावे सांगितल्याने त्यांना अटक केली गेली.