Hathras Case: सर्व आरोपी निर्दोष असून, त्यांची लगेच मुक्तता करा; भाजप नेत्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 03:24 AM2020-10-08T03:24:02+5:302020-10-08T07:30:26+5:30
Hathras Case: बलात्कार झालेल्या महिलांचे मृतदेह गव्हाच्या नव्हे, तर तांदळाच्या शेतातच का आढळून येतात? कारण त्यांची मरण्याची जागा तीच असते, असे लाजिरवाणे उद्गार बाराबंकी येथील भाजपचे नेते रणजित श्रीवास्तव यांनी काढले.
बाराबंकी : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील दलित मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी निर्दोष असून, त्यांची तात्काळ मुक्तता करा. बलात्कार झालेल्या महिलांचे मृतदेह गव्हाच्या नव्हे, तर तांदळाच्या शेतातच का आढळून येतात? कारण त्यांची मरण्याची जागा तीच असते, असे लाजिरवाणे उद्गार बाराबंकी येथील भाजपचे नेते रणजित श्रीवास्तव यांनी काढले.
रणजित श्रीवास्तव यांनी म्हटले आहे की, त्या मुलीने मुलाला बाजरीच्या शेतात बोलाविले होते, कारण प्रेमाचा मामला होता. या सर्व गोष्टींचा तपशील समाजमाध्यमांवर व वृत्तवाहिन्यांच्या बातम्यांमध्येही उपलब्ध आहे. अशा प्रकारच्या मुली काही विशिष्ट जागीच मेलेल्या आढळून आल्या आहेत. या मुलींचे मृतदेह उसाच्या, मका, बाजरीच्या शेतात, नाल्यामध्ये, झाडाझुडपांत, जंगलामध्येच आढळून येतात.
या सगळ्या गोष्टींचा नीट विचार झाला पाहिजे. श्रीवास्तव यांचे विचार पुराणकालीन, तसेच अत्यंत बुरसटलेले असल्याची टीका राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी केली आहे. ते कोणत्याही पक्षाचे राजकीय नेते होण्यास पात्र नाहीत, असेही शर्मा यांनी म्हटले आहे. श्रीवास्तव यांना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस पाठविली आहे. (वृत्तसंस्था)
भरपाई कशानेही होणार नाही
श्रीवास्तव म्हणाले की, हाथरस बलात्कार प्रकरणातील आरोपींची काहीही चूक नसून त्यांची त्वरित सुटका करण्यात आली पाहिजे. या आरोपींचे निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंतचा काळ त्यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे. या तरुणांच्या आयुष्यातील वाया जाणाऱ्या या दिवसांची भरपाई आणखी कशानेही होणार नाही. रणजित श्रीवास्तव यांनी केलेल्या वक्तव्याची व्हिडिओ फीत समाजमाध्यमावर झळकली आहे.