Hathras Case: हाथरसमध्ये आलेल्या राजकीय कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीमार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 05:58 AM2020-10-05T05:58:38+5:302020-10-05T06:49:33+5:30
Hathras Case: प्रचंड तणाव; परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप, नेत्यांनी कुटुंबीयांची घेतली भेट
हाथरस : उत्तर प्रदेशातील बलात्कारपीडित दलित तरुणीच्या हाथरस जिल्ह्यातल्या गावात अद्याप प्रचंड तणाव आहे. गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पीडित कुटुंबीयांना भेटू इच्छिणाऱ्या समाजवादी पक्ष, राष्ट्रीय लोक दलाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी रविवारी लाठीमार केला. रालोदचे नेते जयंत चौधरी यांनाही पोलिसांनी लाठ्या मारल्या.
मात्र, भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद, समाजवादी पक्ष, रालोदच्या नेत्यांनी दलित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. गावात जमावबंदी असताना चार आरोपींच्या समर्थनार्थ त्यांच्या जातीच्या लोकांनी पीडितेच्या घरासमोरच सभा घेतली. पोलिसांनी त्यांना मात्र अटकाव केला नाही. त्यातच भाजपचे काही नेते आता आरोपींच्या बाजूने बोलू लागले आहेत. त्यात भाजपचे एक आमदार, माजी आमदार व स्थानिक नेत्यांचा समावेश आहे. समाजवादी पक्षाच्या शिष्टमंडळाने मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली तसेच सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. या शिष्टमंडळाला उत्तर प्रदेश पोलिसांनी काही काळ अडविले होते. तसेच शिष्टमंडळासह जाऊ पाहाणाऱ्या समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. बलात्कार घटनेच्या चौकशीसाठी समाजवादी पक्षाने एक समिती स्थापन केली आहे. राष्ट्रीय लोक दलाचे नेते जयंत चौधरी यांनी देखील दलित मुलीच्या कुटुंबीयांची त्यांच्या गावी जाऊन रविवारी भेट घेतली. जयंत चौधरी गावात एका ठिकाणी पत्रकारांशी बोलत असताना ते व त्यांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अचानक लाठीमार सुरू केला. त्यामुळे चौधरी व कार्यकर्ते सैरावैरा पळू लागले.
पीडितेच्या कुटुंबीयांना वाय-प्लस सुरक्षा द्या
दलित मुलीच्या कुटुंबीयांना वाय-प्लस सुरक्षा द्या, अशी मागणी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी केली. त्यांनी दलित मुलीच्या कुटुंबीयांची त्यांच्या गावी जाऊन भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. चंद्रशेखर आझाद यांना गावापासून पाच किमी दूर अंतरावर पोलिसांनी रोखले. त्यानंतर, गावाच्या वेशीवर त्यांना पुन्हा रोखण्यात आले.
पोलिसांनी मागितली प्रियंका गांधी यांची माफी
लखनौ : प्रियंका गांधी शुक्रवारी हाथरस येथे जात असताना पोलिसांनी त्यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर, उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधी यांची माफी मागितली. हायवेवर पोलीस काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार करीत होते. त्यावेळी हस्तक्षेप करणाºया प्रियंका यांचा कुर्ता पोलिसांनी खेचला होता.
संपादक संघटनेतर्फेनिषेध
हाथरस प्रकरणाच्या बातम्या मिळवण्यासाठी तिथे गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पोलिसांनी जी वाईट वागणूक दिली, त्याचा एडिटर्स गिल्ड आॅफ इंडियाने निषेध केला आहे.