Hathras gangrape case : योगी आदित्यनाथांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; प्रियंका गांधींची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 10:36 AM2020-09-30T10:36:14+5:302020-09-30T10:41:38+5:30
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा मागितला आहे.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. दिल्लीत सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मंगळवारी पीडितेचा मृत्यू झाला. यामुळे देशभर संताप व्यक्त होत आहे.
आधी पोलिसांनी दुर्लक्ष केले, त्यानंतर जेव्हा मृत्यू झाला तेव्हा पोलिसांनी हाथरस येथे मध्यरात्री जबरदस्तीने अंत्यसंस्कार केले. पोलिसांच्या या भूमिकेवरून विरोधकांनी उत्तर प्रदेशातील सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा मागितला आहे.
प्रियंका गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. रात्री अडीच वाजता कुटुंबीयांनी विणवनी केली पण हाथरस पीडितेचा मृतदेह जबरदस्तीने यूपी प्रशासनाने जाळला. ती जिवंत असताना सरकारने तिला संरक्षण दिले नाही, जेव्हा तिच्यावर हल्ला झाला तेव्हा सरकारने वेळेवर उपचार दिले नाहीत, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.
..अधिकार छीना और मृतका को सम्मान तक नहीं दिया।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) September 30, 2020
घोर अमानवीयता। आपने अपराध रोका नहीं बल्कि अपराधियों की तरह व्यवहार किया।अत्याचार रोका नहीं, एक मासूम बच्ची और उसके परिवार पर दुगना अत्याचार किया।@myogiadityanath इस्तीफा दो। आपके शासन में न्याय नहीं, सिर्फ अन्याय का बोलबाला है।
याचबरोबर, पीडितेच्या मृत्यूनंतर सरकारने कुटुबीयांकडून मुलीच्या अंत्यसंस्काराचा हक्क काढून घेतला आणि मृताला सन्मान दिला नाही, असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे. तसेच, मोठी अमानुषता, तुम्ही गुन्हेगारी थांबवली नाहीत, उलट तुम्ही गुन्हेगारांसारखी वर्तवणूक केली. अत्याचार थांबवला नाही, एक निष्पाप मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांचा दुप्पट छळ केला, असेही प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.
याशिवाय, प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच आपल्या सरकारमध्ये न्याय नाही, तर फक्त अन्यायाचा बोलबाला आहे, असे प्रियंका गांधी यांनी सांगत योगी सरकारवर टीका केली आहे.
१४ सप्टेंबरला सामूहिक बलात्कार
हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. प्रथम अलिगडच्या जेएन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नंतर सोमवारी तिला दिल्लीला हलविण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले होते की, घटनेच्या वेळी या मुलीचा गळा दाबण्यात आला. अलिगडच्या हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या मुलीचे पाय पूर्णपणे निष्क्रिय झाले होते आणि हातालाही लकवा झाला होता. या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, संदीप, रामू, लवकुश आणि रवी, अशी आरोपींची नावे आहेत.