Hathras Gangrape : हाथरस प्रकरणाला नवं वळण? पीडितेचा भाऊ आणि आरोपीमध्ये फोनवर १०४ वेळा झालं होतं संभाषण
By बाळकृष्ण परब | Published: October 6, 2020 08:43 PM2020-10-06T20:43:37+5:302020-10-06T20:47:13+5:30
Hathras Gangrape News: या प्रकरणाचा तपास करताना उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपी आणि पीडित कुटुंबाचा कॉल रेकॉर्ड तपासला तेव्हा दोन्ही कुटुंबांमध्ये गेल्यावर्षी १३ ऑक्टोबरपासून सातत्याने संपर्क असल्याचे समोर आले.
लखनौ - हाथरसमध्ये एका तरुणीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि नंतर तिच्या झालेल्या मृत्यूमुळे सध्या संपूर्ण देशात संतापाची लाट उसळलेली आहे. या प्रकरणाचा निष्पक्षपाती तपास होऊन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेण्यात आलेली आहे. दरम्यान, या प्रकरणात आता रोज नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. पीडित तरुणीचे कुटुंबीय आणि या प्रकरणाती मुख्य आरोपी संदीप हे फोनच्या माध्यमातून सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होते. तसेच गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून पीडित कुटुंब आणि आरोपीमध्ये तब्बल १०४ वेळा संभाषण झाले होते, असा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणाचा तपास करताना उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपी आणि पीडित कुटुंबाचा कॉल रेकॉर्ड तपासला तेव्हा दोन्ही कुटुंबांमध्ये गेल्यावर्षी १३ ऑक्टोबरपासून सातत्याने संपर्क असल्याचे समोर आले. तसेच यापैकी बहुतांश कॉल हे चंदपा येथून करण्यात आले असे दिसून आले. या परिसर पीडितेच्या गावापासून केवळ दोन किमी अंतरावर आहे.
Hathras Gangrape : पुढील सुनावणी १२ ऑक्टोबरला, 'या' तीन मुद्द्यांवर युपी सरकारला द्यावं लागणार प्रतिज्ञापत्र
समोर आलेल्या कॉल डिटेल्सनुसार ६२ कॉल हे पीडित कुटुंबाकडून करण्यात आले. तर ४२ कॉल हे आरोपी संदीपकडून करण्यात आले. पीडितेचं कुटुंब आणि आरोपींमध्ये नियमितपणे संभाषण होत असल्याचे यूपी पोलिसांच्या तपासात दिसून आले. आरोपी संदीपला पीडितेच्या भावाने कॉल केल्याचे निष्पन्न झाले आहे.
यादरम्यान, या प्रकरणी एसआयटीचा तपाससुद्धा शेवटच्या टप्प्यात आहे. आता एसआयटी आपला तपास अहवाल बुधवारी योगी आदित्यनाथ यांना सुपूर्द करतील अशी शक्यता आहे. गृहसचिव भगवान स्वरूप यांच्या नेतृत्वाखाली डीआयजी चंद्रप्रकाश आणि एसपी पूनम हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
या प्रकरणी एसआयटीने गेल्या आठवड्यात चर्चा सुरू केली होती. तसेच या एसआयटीला सात दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करण्यास सांगितले होते. एसआयटीचे पथक पीडितेचे कुटंबीय राहत असलेल्या चंदपामधील त्या गावातही पोहोचले होते. तसेच एसआयटीने पीडितेच्या कुटुंबीयांचाही जबाब नोंदवला होता.
काय आहे नेमकं प्रकरण
हाथरसमधील एका तरुणीवर १४ सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तसेच पीडित युवतीची आरोपींनी जीभही कापल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच पीडितेच्या मणक्याचे हाडही मोडले होते. क्रूरपणे बलात्कार झालेल्या तरुणीला उपचारांसाठी प्रथम अलीगडमधील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर तिला अधिक उपचारांसाठी दिल्लीमधील सफदरजंग रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र तिथे उपचारांदरम्यान पीडितेचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच पीडितेवर घाईगडबडीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याने उत्तर प्रदेशचे सरकार टीकेचे लक्ष्य होत आहे. पीडित तरुणीवर पोलिसांनी जबरदस्तीने अंत्यसंस्कार केल्याचा आऱोप पीडितेच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.