Hathras Gangrape : हाथरसमध्ये पोलिसांची मुजोरी सुरूच, खासदारांना धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 06:30 AM2020-10-03T06:30:59+5:302020-10-03T06:31:10+5:30
Hathras Gangrape : पोलीस अधीक्षकासह पाच निलंबित : मुख्यमंत्री आदित्यनाथ
हाथरस : उत्तर प्रदेशमधील दलित मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणावरून उठलेले वादळ शमण्याची चिन्हे नाहीत. या मुलीच्या नातेवाइकांची भेट घेण्यासाठी हाथरसला निघालेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना उत्तर प्रदेश पोलिसांनी वाटेतच रोखले. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत या पक्षाचे खासदार डेरेक ओब्रायन खाली पडले. हाथरस प्रकरण पेटत असल्याचे लक्षात येताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांवर कारवाई सुरू केली आहे. हाथरसचे पोलीस अधीक्षक विक्रांत वीर आणि पोलीस उपअधीक्षक यांच्यासह एकूण पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे.
एसआयटी रिपोर्ट पाहिल्यानंतर मुख्यमंत्री योगी यांनी ही कारवाई केल्याचे कळते. मुली आणि महिलांच्या सुरक्षेला सरकार सर्वोच्च प्राधान्य देईल आणि प्रत्येक बलात्काऱ्यास कडक शिक्षा व्हावी, हे पाहिले जाईल, असे ते म्हणाले.
हाथरसला निघालेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, त्या पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी अडविले व त्यानंतर ताब्यात घेतले होते. त्याचप्रमाणे शुक्रवारी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनाही रोखण्यात आले.
पोलिसांनी ढकलले; डेरेक ओब्रायन पडले, महिला खासदारावरही केला लाठीमार
या पक्षाच्या खासदार ममता ठाकूर यांनी असा आरोप केला की, हाथरसला आम्हाला जायचेच आहे, असा आग्रह कायम ठेवल्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी माझा ब्लाउज फाडला तसेच तृणमूल काँग्रेसच्या आणखी एक खासदार प्रतिमा मंडल यांच्यावर लाठीमार केला. त्यामुळे त्या खाली पडल्या. यावेळी पोलिसांशी झालेल्या झटापटीत तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन हे जमिनीवर पडले.
पत्रकारांचीही अडवणूक
दलित मुलीवर बलात्कार झाला, त्या गावी जाण्यापासून एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनाही उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखले आहे. त्यांच्या कॅमेºयांची वायर काढून टाकण्याचा प्रयत्नही पोलिसांनी केला.
तिच्या कुटुंबालाही मदत
नवी दिल्ली : बलरामपूरमध्ये मरण पावलेल्या दलित बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांनाही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पक्के घर, जमीन व एका व्यक्तीस सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली.
या कारवाईमुळे भाजपची प्रतिमा मलीन - उमा भारती
या प्रकरणावरून भाजप नेत्या उमा भारती यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. उमा भारती यांनी टिष्ट्वट केले आहे की, माझ्या माहितीनुसार असा कोणताही कायदा नाही की, ज्यानुसार एसआयटीचा तपास सुरू असताना पीडित परिवाराला कुणालाही भेटता येत नाही. अशाने एसआयटी तपासाबाबत संशय निर्माण होऊ शकतो. पोलिसांच्या या संशयास्पद कारवाईमुळे उत्तर प्रदेश सरकार आणि भाजपची प्रतिमा खराब झाली आहे.
वाल्मीकी मंदिरात प्रियंका
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी दिल्लीतील वाल्मीकी मंदिराला भेट दिली. हाथरसच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी आपण अखेरपर्यंत लढत राहू, असे आश्वासन त्यांनी तिथे जमलेल्या वाल्मीकी समाजाच्या लोकांना दिले. आमचा उत्तर प्रदेश सरकार व पोलिसांवर विश्वास नाही, अशी भावना लोकांनी बोलून दाखवली.